महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील ७ ठिकाणी छापे, गझवा-ए-हिंदवर कारवाई

नागपूर, २४ मार्च २०२३: राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (एनआयए) देशातील तीन राज्यांमध्ये ७ ठिकाणी छापे टाकले. एनआयएचा हा छापा टेरर लिंक्सशी संबंधित प्रकरणात टाकण्यात आलाय. एनआयएनं काल गझवा-ए-हिंद नावाच्या संघटनेशी संबंधित तीन राज्यांच्या ठिकाणी शोध मोहीम सुरू केली. या संघटनेवर महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करण्यात आलीय. गझवा-ए-हिंद संघटनेवर आरोप आहे की, ही दहशतवादी संघटना अल कायदाच्या सहकार्याने काम करत आहे आणि देशविरोधी कट रचण्याचा प्रयत्न करत आहे.

महाराष्ट्रातील नागपूर शहरात तीन ठिकाणी छापे टाकण्यात आलेत. काल पहाटे ४ च्या सुमारास एनआयएचे २० अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक दिल्लीहून आलं. त्यानंतर या पथकानं नागपूर गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सतरंजीपुरा येथील बडी मस्जिद परिसरात शोधमोहीम सुरू केली. एनआयएचे अधिकारी गुलाम मुस्तफा नावाच्या व्यक्तीचा शोध घेत होते.

दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेला गुलाम मुस्तफा नावाचा व्यक्ती नागपूरच्या बडी मस्जिद परिसरात राहत असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. गझवा-ए-हिंदचा दहशतवादी संघटना अल कायदाशी संबंध असल्याची माहिती मिळवण्यासाठी येथे ही शोध मोहीम राबवण्यात आली. संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी मोठ्या संख्येनं पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली होती. ‘द हिंदू’च्या वृत्तानुसार, सात ठिकाणांऐवजी तीन राज्यांत प्रत्येकी तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. छाप्यांदरम्यान काही लोकांना पकडून त्यांची चौकशी करण्यात आली.

देशात दहशत पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करून तरुणांचं ब्रेनवॉश केलं जात असल्याचा आरोप केला जातोय. २२ जुलै २०२२ रोजी पाटणा येथील फुलवारी शरीफ पोलीस ठाण्यात गझवा-ए-हिंद प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास आणि चौकशीनंतर मारगुब अहमद दानिश नावाच्या आरोपीला सांगण्यात आलं की तो गझवा-ए-हिंद नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून तरुणांना दहशत पसरवण्यासाठी भडकावत होता. एनआयएकडून त्याच्याबद्दल सांगण्यात आलं की तो अनेक विदेशी संस्थांच्या संपर्कात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा