बारामती, ८ ऑक्टोंबर २०२०: बारामती शहरातील बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या ऑनलाइन लॉटरीच्या पाच सेंटरवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणने एकाच वेळेस छापेमारी करत काल बुधवार दि.७ रोजी बारामती शहरात ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या लॉटरी सेंटरवर पोलिसांनी धाड टाकली.
बारामती मध्ये अवैधरित्या लॉटरी सेंटर सुरू असल्याची खात्रीलायक खबर मिळाली. येथे मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना खबऱ्यांमार्फत मिळाली. त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व पोलीस स्टाफच्या पथकानं बारामती शहरातील नीरज ऑनलाईन लॉटरी सेंटर, श्रीराम गल्ली बारामती, दीक्षित ऑनलाईन लॉटरी सेंटर श्रीराम गल्ली बारामती, स्वामी समर्थ स्कील गेम लॉटरी सेंटर भाजी मंडई बारामती, स्कील गेम २०२० लॉटरी सेंटर भाजी मंडई बारामती, राजश्री लॉटरी सेंटर खंडोबा नगर बारामती येथे छापे टाकून सदर ठिकाणी विनापरवाना ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या माध्यमातून येथे जुगार खेळला जात असल्याचे दिसून आलं.
याठिकाणी छाप्यात ऑनलाईन जुगाराची साधनं, संगणक संच, प्रिंटर, वायफाय राऊटर, कागदी चिठ्या, मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण ३,६३,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. बेकायदेशीर ऑनलाईन सेंटर चालवणाऱ्यांची नावं तुषार माणिक लोंढे रा. कोष्टी गल्ली बारामती, संकेत पुरुषोत्तम दीक्षित रा. कोष्टी गल्ली बारामती, सुनील अण्णा लष्कर रा.कुरवली रोड फलटण, हेमंत देशमुख रा.निरगुडी ता.फलटण, मनोज बबन सोनवले रा.शंकर भोई तालीम बारामती, सतीश विठ्ठल सूर्यवंशी रा. शंकर भोई तालीम मेन रोड बारामती, गोपाल राधाकिशन शर्मा रा.देसाई इस्टेट बारामती यांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) प्रमाणं गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाई मध्ये पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, नारायण शिरगावकर उपविभागीय अधिकारी बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोसई अमोल गोरे, शिवाजी ननावरे, राजेंद्र थोरात, श्रीकांत माळी, अनिल काळे, रविराज कोकरे, रौफ इनामदार, ज्ञानदेव क्षिरसागर, काशिनाथ राजापुरे, प्रविण मोरे, प्रसन्नजीत घाडगे या कारवाई मध्ये सहभागी होते.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव