दौंडमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या लॉजवर छापा; तिघांना अटक

दौंड : पुणे-सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यातील केडगाव-चौफुला जवळ असलेल्या धनश्री लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात लॉज मालकासह तीन आरोपींना अटक केली आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवार (दि.४) रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.
लॉजचे मालक पियुष धनाजी देशमुख (वय २२ वर्षे रा. केडगाव, ता. दौंड), कृष्णा संजय गोंगाने (रा. हिंगोली), प्रशांत श्रावण मोहोड (वय ३५ वर्षे रा. चांदुर रेल्वे जि. अमरावती) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणाची अधिक माहिती अशी आहे की, या धनश्री लॉजवर अवैधपणे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांना खबऱ्या मार्फत मिळाली होती. त्यानुसार शर्मा यांनी बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, बारामती क्राईम ब्रँचचे सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संपत खबाले, गणेश पोटे, अश्विनी भोसले यांच्या पथकाने या हॉटेल धनश्री लॉजवर अचानक छापा मारला. यावेळी आरोपी हे स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी दोन महिला यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असताना मिळून आले.
या लॉजवर वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर यवत पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल हँडसेट, निरोध असा ३२ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांना महिला सुधार गृहात दाखल करण्यात आले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा