नवी दिल्ली, दि. ७ मे २०२०: रेल्वे मंत्रालयाने ५२३१ रेल्वे कोचांचे रुपांतर, कोविड केअर केंद्र म्हणून केले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या (एम ओ एच एफ डब्ल्यू) नियमावलीनुसार हे कोच फारशा गंभीर नसलेल्या रुग्णांसाठी वापरता येतील. ज्या राज्यांमध्ये आरोग्यसुविधा अपुऱ्या पडू लागतील आणि संशयीत तसेच निश्चित रोगनिदान झालेल्या रुग्णांसाठी विलगीकरण कक्षांची गरज भासेल तिथे हे कोच उपलब्ध करून दिले जातील.
कोविड-१९ विरूद्धच्या लढ्यात आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यास भारत सरकारला भारतीय रेल्वे सर्वतोपरी मदत करत आहे. राज्यांना ५२३१ कोविड केअर केंद्रे पुरवण्यासाठी रेल्वे तत्पर आहे. विभागीय रेल्वेने हे कोच अलगीकरण (कॉरंटाईन) सुविधेसाठी रुपांतरीत केले आहेत.
२१५ स्थानकापैकी ८५ स्थानकांवर रेल्वे आरोग्यसेवा पुरवणार, तर १३० स्थानकांवर कर्मचारी आणि आवश्यक औषधे यांची सोय राज्यांकडून होत असल्यास त्या त्या राज्यांच्या मागणीनुसार कोविड केअर कोच उपलब्ध होणार. या कोविड केअर केंद्रांना वीज आणि पाणी पुरवठ्यासाठी १५८ स्थानके उपलब्ध राहतील.
कोविड-१९ आव्हानासाठी कोविड केअर केंद्रांशिवाय २५०० डॉक्टर आणि ३५,००० पूरक वैद्यकीय व्यावसायिक भारतीय रेल्वेने नियुक्त केले आहेत. विविध विभाग स्तरावर या नियुक्त्या हंगामी तत्वावर केल्या आहेत. रेल्वे रुग्णालयांपैकी १७ कोविड समर्पित रुग्णालयात ५००० खाटा तर ३३ रुग्णालय विभागात गंभीर पातळीवरच्या कोविड रुग्णाला उपचार मिळतील.
एम ओ एच एफ डब्ल्यू च्या नियमावलीनुसार, राज्य सरकारे रेल्वेकडे मागणी करतील तेव्हा रेल्वे हे कोच त्या त्या राज्याच्या वा केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करून देईल. रेल्वेकडून नियुक्ती झाल्यावर हे कोच जिल्हाधिकारी वा जिल्हा दंडाधिकारी वा तत्सम अधिकाऱ्याकडे सुपूर्द करून आवश्यक त्या साधनसामग्रीसह गरज असलेल्या स्थानकांवर ठेवण्यात येतील. या कोचचा वीजपुरवठा, गरज असल्यास दुरुस्ती, खानपान सेवा, सुरक्षा या बाबींची काळजी रेल्वे घेईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी