मिझोराममध्ये बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळला

मिझोरम, २३ ऑगस्ट २०२३ : मिझोरामची राजधानी ऐजॉलजवळ आज सकाळी एक प्रचंड मोठी दुर्घटना घडली आहे. सायरांग येथे रेल्वेचा बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला आहे. त्याच्यासोबत कुतुब मिनारहूनही अधिक उंच असा पिलरही कोसळला आहे. या दुर्घटनेत १७ जणांचा जागीच मृत्यू झाला असुन ३० ते ४० लोक या दुर्घटनेत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अडकलेल्यांना ढिगाऱ्याखालून काढण्याचं युद्ध पातळीवर काम चालू आहे. तसेच या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिझोरामच्या रेल्वे ओव्हर ब्रिज प्रकल्पावर हे मजूर काम करत होते. दुर्घटनाग्रस्त पुल क्रमांक १९६ ची उंची १०४ मीटर आहे. हा पूल दिल्लीच्या कुतुबमिनारपेक्षा उंच आहे. या पुलावरून रेल्वे वाहतूक सुरू झाल्यानंतर मिझोराम हे राज्य देशाच्या विशाल रेल्वे नेटवर्कशी जोडलं जाईल, असा दावा प्रशासनानं केला होता, पण या पुलाचं काम पूर्ण होऊन तो सुरू होण्यापूर्वीच तो दुर्घटनेला बळी पडला आहे.

घटनेच्या वेळी पुलावर ३५ ते ४० मजूर काम करत होते. कुरुंग नदीवर बैराबी ते सायरंग जोडणारा हा पूल बांधला जात होता. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. मिझोरमचे मुख्यमंत्री जोराम थांगा यांनी अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रशासन मदत कार्य करत असल्याचे त्यांनी म्हटले. तसचे जखमींच्या दीर्घायुष्यासाठी त्यांनी प्रार्थना केली.

तिसऱ्या आणि चौथ्या पिलरमधील गर्डर ३४१ फूट खाली कोसळलाय, पुलामध्ये एकूण चार पिलर आहेत. व्हीडिओमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या पिलरमधील गर्डर तुटल्याने खाली पडल्याचे दिसत आहे. सर्व मजूर याच गर्डरवर काम करत होते. जमिनीपासून पुलाची उंची १०४ मीटर म्हणजे ३४१ फूट आहे, म्हणजे हा पूल कुतूबमिनारापेक्षाही उंच आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मिझोराममध्ये निर्माणाधीन रेल्वे पूल कोसळून झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई जाहीर केली. पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या पोस्टनुसार, PM मोदी म्हणाले, “मिझोरममधील पूल दुर्घटनेत लोकांच्या मृत्यूने दुःख झाले. ज्यांनी आपले कुटुंबीय गमावले आहेत त्यांच्याबद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. पंतप्रधान म्हणाले की, घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू असून बाधितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे.

पंतप्रधानांनी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून प्रत्येकी २ लाख रुपयांची एक्स-ग्रॅशिया जाहीर केली आहे. पीएमओच्या म्हणण्यानुसार अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला ५०,००० रुपये दिले जातील.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा