आरक्षित तिकिट विक्रीतून रेल्वेने कमविला कोट्यवधींचा गल्ला

नवी दिल्ली, दि.१२मे २०२०: दोन महिन्यांच्या कालावधीनंतर भारतीय रेल्वे आज पुन्हा एकदा नागरिकांच्या सेवेसाठी दाखल झाली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या घोषणेनंतर रेल्वे कडून खास सुविधा पुरवण्यासाठी म्हणून अधिकृत संकेतस्थळावर सोमवार(दि.११) पासून तिकीट विक्री सुरु करण्यात आली. या संकेतस्थळावरून हजारो प्रवाशांनी तिकीट आरक्षित केली. त्यामुळे रेल्वेने आरक्षित केलेली तिकिटे काही तासातच संपल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून रेल्वेला या तिकीट आरक्षणातून चांगला आर्थिक फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे सुविधेअंतर्गत जवळपास ८२,३१७ प्रवाशांनी आरक्षित तिकीटे देण्यात आली आहेत. या प्रक्रियेदरम्यान, ४५,५३३ पीएनआर नंबरही देण्यात आले. या आरक्षित तिकिटातून रेल्वे प्रशासनाने कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे.

बऱ्याच दिवसांपासून रेल्वे सुरु करण्याची मागणी अनेक स्तरांतून करण्यात येत होती. अखेर रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत संकेतस्थळावरुन तिकीट विक्रीस सुरुवात केली. तेव्हा १६,१५,६३,८२१ रुपये इतकी घसघशीत कमाई रेल्वेच्या खात्यात जमा झाली आहे. ही रक्कम अनेकांच्याच भुवया उंचावत आहे.

सोमवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून तिकीटांच्या ऑनलाईन बुकिंगला सुरुवात झाली होती. ज्यानंतर ऑनलाईन बुकिंग सुरु होताच हावडा – दिल्ली या एक्स्प्रेस गाडीतील फर्स्ट एसी आणि थर्ड एसी क्लासमधील सर्व तिकीटे अवघ्या १० मिनिटांत विकली गेल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा