पावसाची विश्रांती २० ऑगस्टपर्यंत राहणार, अलनिनोच्या प्रभावामुळे चिंता वाढली

पुणे, १३ ऑगस्ट २०२३ : राज्यात यंदा मान्सून उशिराने दाखल झाला. जुलै महिन्यात सर्वत्र थैमान घातले होते. विदर्भ आणि कोकणात अतिवृष्टी झाली. यामुळे उशिराने दाखल झाल्यानंतर पावसाने सरासरी गाठली. परंतु आजही राज्याच्या बहुतेक क्षेत्रात गंभीर परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके त्यांना पावसाअभावी जगवणे मुश्किल झाले आहे. राज्यातील धरणांमध्ये जलसाठा वाढू लागला होता. परंतु ऑगस्ट महिना सुरु होताच पावसाने दडी मारली आहे. देशात मान्सूनवर अलनिनोचा प्रभाव दिसून येत आहे. यामुळे चिंता निर्माण झाली आहे. राज्यात पावसाची ही विश्रांती २० ऑगस्टपर्यंत राहणार, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

ऑगस्ट महिन्यापासून पाऊस नाही. यामुळे चिंता निर्माण झाली आहे. मान्सून एक टक्क्याच्या घटीसह निगेटिव्ह झोनमध्ये गेला आहे. ऑगस्ट महिन्यात मान्सूनमध्ये २९ टक्के कमी आहे. देशात १६ ऑगस्टपासून तर राज्यात २० ऑगस्टपासून मॉन्सूनला अनुकूल परिस्थिती निर्माण होईल,असे कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे.

यंदा पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा ६५% कमी पाऊस झाला आहे. पुणे जिल्ह्यात १ ते १२ ऑगस्ट दरम्यान १२७ मिलिमीटर पाऊस पडतो. परंतु यंदा केवळ ४४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ५७० मिलिमीटर पाऊस झाला आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा जलसाठा झाला आहे. परंतु पावसाने ओढ दिल्यास चिंता निर्माण करणारी परिस्थिती असणार आहे.पुणे जिल्ह्यातील पानशेत धरण १००% भरले आहे. यामुळे पानशेत धरणक्षेत्रातील वरसगाव खोऱ्यातील नागरिकांकडून धरणाच्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा