मनमाडच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा..

मनमाड, नाशिक १७ जुलै २०२३ : कॉमनवेल्थ वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक, तृप्ती शेखर पाराशर हीची सलग पाचव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली. तर जय भवानी व्यायाम शाळेचा आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर याची भारतीय संघात निवड झाली आहे.

उत्तर प्रदेश नोएडा येथे, १२ जुलै ते १६ जुलै २०२३ दरम्यान होणाऱ्या ‘कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप’ साठीच्या वरिष्ठ गटात, मनमाडच्या ‘जय भवानी व्यायाम शाळेचा’ मुकुंद संतोष आहेर याची भारतीय संघात ५५ किलो वजनी गटात निवड करण्यात आली आहे. नागरकोईल येथे झालेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ज्युनिअर व सीनियर गटात, राष्ट्रीय विक्रम स्थापित करणारा मुकुंद आपल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज झाला असून नोएडा येथे होणाऱ्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत मुकुंद भारतासाठी पदक प्राप्त करण्याची शक्यता आहे. मुकुंद आहेर यास छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

सलग पाचव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी, भारतीय संघाची वेटलिफ्टींग प्रशिक्षक म्हणून निवड झालेली तृप्ती शेखर पाराशर ही महाराष्ट्रातील एकमेव प्रशिक्षक आहे. स्पर्धेत त्यांच्या मार्गदर्शनाखालील खेळाडूंकडून उत्तम कामगिरी होईल अशी त्यांना खात्री आहे. जय भवानी व्यायामशाळेचे पदाधिकारी, छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ, मुख्यध्यापक, संचालक, महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे पदाधिकारी यांनी टीम चे अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी- मनमाड, नाशिक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा