आज दिल्लीत एनडीएची बैठक, बैठकीला ३८ पक्ष उपस्थित राहणार, तर विरोधी पक्षांची बैठक बंगळुरुत

मुंबई, १८ जुलै २०२३ : लोकसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. आता सत्ताधारी आणि विरोधकांनी मित्रपक्षांची मोट बांधायला सुरुवात केली आहे. राजधानी दिल्लीत आज एनडीएची बैठक पार पडत आहे. तर बिहारच्या पटनामध्ये विरोधकांची बैठक झाल्यानंतर आता आज बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांच्या बैठकीचा दुसरा दिवस आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार आहेत. तर ठाकरेगटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कालच बंगळुरुत दाखल झाले आहेत.

आज दिल्लीत सत्ताधाऱ्यांची अर्थातच एनडीएची बैठक पार पडतेआहे. या बैठकीला ३८ पक्ष उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. तर काही दिवसांपूर्वी भाजपसोबत गेलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर लोक जनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान, नुकतेच एनडीएमध्ये सहभागी झालेले सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे नेते ओमप्रकाश राजभर, हिंदुस्तानी अवाम मोर्चा, राष्ट्रीय लोक जनता दलाचे उपेंद्र कुशवाहा, पवन कल्याण यांच्या नेतृत्वातील जनसेना,महाराष्ट्रातून प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू या एनडीएच्या बैठकीत सहभागी होणार आहे.

एनडीएच्या या बैठकीच्या शिवाय विरोधी पक्षांचीही बैठक बंगळुरुमध्ये होणार आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात रणनिती ठरवली जाणार असल्याची माहिती आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. कर्नाटकातील बंगळुरुत ही बैठक पार पडत आहे. या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. आज या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सहभागी होणार आहेत. तर या बैठकीच्या पहिल्या दिवशी म्हणजे काल संध्याकाळी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांचे स्नेहभोजन झाले. यावेळी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे विविध विषयांवर चर्चाही झाली.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, जेडीयूचे नेते, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, डीएमकेचे प्रमुख, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव हे सहभागी झाले होते.झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव, नेशनल कॉन्फ्रेंसचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला, पीडीपीच्या नेत्या महबूबा मुफ्ती यादेखील सहभागी झाल्या होत्या.

न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा