आजपासून पुढील ४ दिवस राज्यात पाऊस, मुंबई, कोकणसह मराठवाडा, विदर्भासाठी अलर्ट!

पुणे, २९ ऑगस्ट २०२१:  काही दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाचं राज्यात आजपासून पुढील चार दिवस पुन्हा आगमन होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. राज्यात ३० ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढणार असून परभणी, नाशिक, ठाणे, रायगडसह पालघर जिल्ह्यात ऑरेंज अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाचे क्षेत्र आणि त्याचा पश्चिम व मध्य भारत क्षेत्रातून प्रवासाच्या शक्यतेमुळे राज्यात येत्या ४ ते  ५ दिवसांत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
मराठवाड्यासह विदर्भातही पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २९ ऑगस्टला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पावसाने विश्रांती घेताच राज्यातील हवामानात झपाट्याने बदल झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी सरासरीखाली असणारे राज्यातील दिवसाचे कमाल तापमान आता सरासरीपुढे गेले असून, काही ठिकाणी ते सरासरीपेक्षा ४ ते ५ अंशांनी वाढले आहे. त्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडय़ातही अचानक वाढ  झाली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात सर्वत्र पावसाळी स्थिती निर्माण झाली होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यापर्यंत अनेक भागात कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा