चिपळूण, २३ जुलै २०२१: चिपळूण शहरामध्ये सध्या पुन्हा पावसाला सुरुवात झालीय. चिपळूण शहरातील पाणी अद्यापही ओसरलेलं नाही. चिपळूण शहरातील भयानक परिस्थिती निर्माण झालीय. हजारो लोक पुरात अडकले असून एनडीआरफच्या टीम बचावकार्यासाठी दाखल झाल्या आहेत. चिपळूणमधील पूरपरिस्थिती लक्षात घेत एनडीआरएफच्या दोन टीम आधीच त्याठिकाणी पाठवल्या आहेत. या दोन्ही टीम चिपळूणमध्ये पोहोचल्या असून त्यांनी पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचं काम सुरु केलं आहे.
चिपळूण शहरात २०२ मिमी पडलेला पाऊस, त्यापाठोपाठ कोयना धरण भरल्यामुळे खालच्या धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करावा लागला. दोन्हीकडून पाणी शहरात आल्यामुळे आख्खं शहर पाण्याखाली गेलं आहे. चिपळूणमध्ये २००५ पेभा भयानक स्थिती निर्माण झालीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुराच्या स्थितीचा आढावा घेतला आहे. तर, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या दोन हेलिकॉप्टर चिपळूणकडे रवाना झाली असून मदतकार्य करण्यात येणार आहे.
रात्रीपासून शहरातील बाजारपेठ ,खेर्डी मध्ये मध्ये पाच फुटापेक्षा जास्त पाणी शिरले असून अख्खी बाजारपेठ पाण्याखाली आहे. याशिवाय शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून मुंबई-गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे . तर शहरातील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले आहेत.
जगबुडी, वशिष्टीसह अनेक नद्यांनी धोका पातळी ओलांडली
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीची धोका पातळी ७ मीटर असून सध्या ती ९ मीटर वरून वाहते आहे. वशिष्टी नदीची धोका पातळी ७ मीटर असून ती ७.८ मीटर वरून वाहते आहे. काजळी नदी धोका पातळीच्या १.७४ मीटर वरून वाहत असून कोदवली, शास्त्री, बावनदी या नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत. यामुळे खेड, चिपळूण, लांजा, राजापूर, संगमेश्वर या शहरे व परिसरातील गावांमध्ये शासकीय यंत्रणांनी नागरिकांना हलवणे, स्थलांतर करणे व इतर मदत कार्य जोरात सुरु केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे