राज्यात पुढील चार दिवस पावसाचा इशारा…

मुंबई, 9 जानेवारी 2022: गेल्या वर्षात वर्षभर पावसाची रिपरिप सुरूच होती. यंदाच्या वर्षाची सुरुवात देखील पावसानेच होणार असल्याचं दिसत आहे. कारण हवामान खात्याने राज्य पुढील चार दिवसांसाठी पावसाचा इशारा दिलाय. उत्तर भारतातील बर्फवृष्टीचा देशाच्या उर्वरित भागात परिणाम झाला असून पुढील चार दिवस पावसाचे असतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. दरम्यान मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांत पावसाने हलक्या ते मध्यम स्वरूपाची हजेरी लावली. या पावसाने मुंबई शहरासह उपनगरांमध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला आहे.

या आठवड्याभरात अनेक ठिकाणी थंडीचं प्रमाण वाढलं होतं. आता या थंडीनंतर पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील चार दिवस गडगडाटी वादळासह पाऊस कोसळेल, अशी शक्यता आहे. 8-11 जानेवारीदरम्यान मध्य प्रदेशात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तसेच रविवार ते मंगळवार, 9-11 जानेवारी या कालावधीत छत्तीसगढ आणि महाराष्ट्राच्या विदर्भ परिसरातही अशीच परिस्थिती दिसून येईल.

याशिवाय काल पश्चिम मध्य प्रदेश, आज पूर्व मध्य प्रदेश तसेच सोमवार आणि मंगळवारी छत्तीसगडमध्ये ढगांचा गडगडाट, वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि गारांचा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामानातील या बदलाला अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातून वायव्य आणि लगतच्या मध्य भारतामध्ये येणाऱ्या उच्च पातळीची आर्द्रता कारणीभूत असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पुढील तीन ते चार दिवस मध्य भारतावर दोन्ही बाजूंनी वाऱ्यांचा संगम सुरू राहील. मध्य पाकिस्तानस्थित पश्चिम विक्षोभ तसेच नैऋत्य राजस्थानवर त्याच्या प्रेरित चक्रीवादळाचा प्रभाव असेल. एकत्रितपणे या प्रणालींमुळे या आठवड्याच्या शेवटी उत्तर आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये दमट वातावरण निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा