इंदापूर तालुक्यात पावसाचा कहर सुरूच; रस्त्यांना आलं नाल्याचं स्वरूप

इंदापूर, १४ ऑक्टोबर २०२०: इंदापूर शहर तालुक्यामध्ये आज सकाळपासूनच पावसाने सुरुवात केली होती. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला होता. इंदापूर शहरांमधील रस्त्यांना अगदी नाल्याचे स्वरूप आले होते तर शहरांमधून जाणारा आश्रय महामार्ग पूर्णतः पाण्याखाली गेल्याने शहरांमधून होणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती.

तालुक्यातील लोणी देवकर, न्हावी, रूई, निमगाव केतकी आदी गावांसह अनेक वाड्या-वस्त्यांवर तसेच शेती अगदी जलमय झाली होती. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिक कमालीचे भयभीत झाले आहेत.

आयुष्यात पहिल्यांदाच असा पाऊस पडल्याने लोणी देवकर गावामध्ये पूरसदृश्य स्थिती झाल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगत आहेत. अशातच वीजप्रवाह खंडित झाल्याने गावातील युवकांना मदत कार्यात अडथळा निर्माण होत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षितस्थळी जावे तसेच ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे न्हावी गावचे सरपंच बळी बोराटे यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा