राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर कायम, मराठवाड्यातल्या अनेक धरणातून विसर्ग सुरु

महाराष्ट्र, २१ सप्टेंबर २०२०: राज्याच्या अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी अधूनमधून कोसळत आहे. अनेक धरणातून पाण्याचा विसर्गही सुरु आहे. मराठवाड्यात गेल्या अनेक दिवसापासून होणाऱ्या अतिवृष्टीमुळं अनेक ठिकाणी पिकाचं नुकसान झालं असून नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातल्या निम्न दुधना प्रकल्प परिसरात मोठा पाऊस झाल्यानं प्रकल्पात पाण्याची आवक सुरु झाली आहे. त्यामुळे आज सकाळी धरणाचे ४ दरवाजे उघडून दुधना नदी पात्रात सात हजार १९० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातल्या पुर्णा नदीवरील एलदरी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु असून धरणाचे १० दरवाजे अर्ध्यामीटरने उघटडण्यात आले यातून सुरुवातीला २२ हजार क्युसेक आणि त्यानंतर ३१ हजार क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे.

नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. तसंच जायकवाडी, येलदरी, माजलगाव, विष्णुपूरी आदी धरणातून गोदावरी नदी पात्रात सतत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत आहे. त्यामुळे काल दुपारपासून नांदेड इथल्या विष्णुपुरी प्रकल्पाचे आणखी दोन दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून एक लाख ११ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

लोहा तालुक्यातल्या उर्ध्व मणार प्रकल्प आणि लिंबोटी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे लिंबोटी धरणाचे सहा वक्र दरवाजे काल सायंकाळी उघडण्यात आले. हिंगोली जिल्ह्यात वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी या तालुक्यातल्या अनेक भागांमध्ये काल सायंकाळी जोरदार झाला.

जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या बारसवाडा इथल्या गल्हाटी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला असून, पाणी सांडव्यावरून ओसंडून वाहत आहे. त्यामुळे गल्हाटी धरण क्षेत्रातल्या गावांचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.

नाशिक जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने चांगली हजेरी लावली त्यामुळे जलाशयाच्या साठ्यात देखील वाढ झाली आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण ९९ टक्के भरले आहे. निफाड तालुक्यातल्या नांदूर-मधमेश्वर धरणातून १२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

काल रविवारी दुपारपासून पुणे शहरातील विविध भागात मुसळधार पावसाने चांगली हजेरी लावली त्यामुळे जलाशयाच्या साठ्यात देखील वाढ झाली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची तीव्रता वाढली आणि त्यानंतर रात्री ८.३० वाजेपर्यंत शहरात १२ तासांच्या १२ मिमी पावसाची नोंद झाली. पुणे शहराचा हंगाम ७४३.६ मिमी पाऊस पडला आहे, जो सामान्यपेक्षा जवळपास ५० टक्के जास्त आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा