पुणे, ७ सप्टेंबर २०२१: मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती ओढावली आहे. अनेक गावं पाण्याखाली गेली, दरड कोसळली. यामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं आहे. अश्यात हवामान खात्याने पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आता पुन्हा एकदा हवामान खात्याने दिलेल्या या मुसळधार पावसाचा फटका बसणार असल्याची चिन्हे आहेत. राज्यात ५ ते ९ सप्टेंबर दरम्यान गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. आता हा पावसाचा जोर आणखीन वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.
मुंबई, पालघरसह राज्याच्या विविध भागांत पुढील तीन-चार तासांत मुसळधार पाऊस पडेल, तसेच काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यादृष्टीने खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाचा प्रभाव सर्वदूर असणार आहे तर सात आणि आठ सप्टेंबरला कोकण, मध्य महाराष्ट्रमध्ये पावसाची तीव्रता जास्त असणार आहे. इतकंच नाहीतर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये नागरिकांनी बाहेर पडण्याआधी हवामानाचा अंदाज घेत बाहेर पडावं अशा सूचनाही हवामान खात्याकडून देण्यात आले आहेत.
चिपळूणमध्ये नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. वाशिष्ठी नदी पात्राची पातळी सध्या धोक्याची नाही. मात्र असाच पाऊस पडत राहिला तर नदीपात्रामध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे नगरपालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढल्यानंतर धरणात पाणीसाठा वाढला आहे. जायकवाडी धरणात ४४.८१ टक्के पाणीसाठा आहे. निम्न दुधना, सिद्धेश्वर धरणात ९८ टक्के पाणीसाठा आहे. मानार धरण भरले असून माजलगाव, मांजरा, येलदरी, विष्णुपुरी धरणात पाणीसाठा वाढत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे