पुणे ३० जुलै २०२४ : शि. द. फडणीस यांनी काढून ठेवलेली व्यंगचित्र ही वरवर सोपी आणि सहज वाटत असली तरी ती व्यंगचित्र सोपी नाहीत, त्यासाठी परिश्रम आणि चिंतनाची बैठकच लागत, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात व्यक्त केले. शिवराम दत्तात्रय फडणीस अर्थात सर्वांचे लाडके ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द.फडणीस यांनी काल १०० व्या वर्षांत पदार्पण केले. त्या निमित्त वसुंधरा क्लब आणि कार्टूनिस्ट्स कम्बाईन यांच्या संयुक्त विद्यमाने कोहिनूर प्रस्तुत ‘शि. द. १००’ या भव्य चार दिवसांच्या महोत्सवास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते फडणीस यांच्या सत्काराने प्रारंभ झाला. त्यावेळी ठाकरे बोलत होते. हा महोत्सव १ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे.
यावेळी व्यासपीठावर महोत्सवाचे निमंत्रक राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत, प्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले, महोत्सवाचे स्वागताध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे मुख्य कार्यकारी संचालक कृष्णकुमार गोयल, सुहृद होम्स अॅन्ड हॉलिडेज पुणेचे सहसंस्थापक मकरंद केळकर, स्किन सिटीचे संचालक डॉ.नितीन ढेपे, महोत्सव संयोजक वसुंधरा क्लबचे वीरेंद्र चित्राव, कार्टूनिस्ट्स कम्बाईनचे चारुहास पंडित, संजय मिस्त्री आणि नचिकेत ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
‘शिदं’चा हा ह्रद्य नागरी सत्कार सोहळा बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न झाला .यावेळी ‘शिदं’चा सन्मान पुणेरी पगडी, उपरणे आणि मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. राज ठाकरे यावेळी म्हणाले, शंभराव्या वर्षात देखील फडणीस ज्या ताठ कण्याने चालत आहेत त्याच्या निम्या स्वाभिमानाने राज्य सरकारने सरकार चालवावे. या झाडाची फळे हवीत, त्या ही झाडाची फळे हवीत या हट्टाहासामुळे स्वतःचे हसे करून घेऊ नये. व्यंगचित्रकार शि.द.फडणीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यातील आडनावाचे साधर्म्य हेरत राज ठाकरे मिश्किलपणाने म्हणाले की, व्यंगचित्रकार शि.द.फडणीस हे त्यांच्या आडनावातील केवळ “व ” च्या फरकामुळे वाचले आणि ते व्यंगचित्राच्या क्षेत्रात आले. हा ” व ” चा फरक राहिला नसता तर ते ही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लायनीत गेले असते आणि केवळ फडणवीसां सारखे ” व्यंगचित्र ” बनून रहिले असते, असा मिश्किल टोला लगावलाय.
राज ठाकरे पुढे म्हणाले, केवळ कल्पना सुचली परंतू त्याला साजेसे कल्पक व्यंगचित्राची जोड नाही मिळाली तर ती कल्पना रुचत नाही. तसेच व्यंगचित्र उत्तम आहे, परंतू कल्पना व्यंगचित्राला साजेशी नसेल तर ते व्यंगचित्र फसते. म्हणून चांगले व्यंगचित्र आस्तित्वात येण्यासाठी दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत . व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्या एका ही व्यंगचित्रात हे समीकरण बिघडलेले दिसत नाही, म्हणूनच फडणीस यांची व्यंगचित्रे तांत्रीक दृष्ट्या परिपूर्ण तर आहेतच परंतू ती सर्वसामान्यांच्या मनाचा ठाव घेतात.
महोत्सवाचे निमंत्रक राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील त्यांच्या मनोगतात म्हणाले, पुणे महानगर पालिकेच्या माध्यमातून पुण्यात व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्या कार्याचा गौरव म्हणून लवकरच अकादमी सुरू करण्यात येईल. राज्य सरकार या अकादमीसाठी पूर्ण क्षमतेने आर्थिक पाठबळ देईल, असे आश्वासनही पाटील यांनी यावेळी दिले. व्यंगचित्र क्षेत्रातील माहितगार तज्ज्ञांनी यासाठी पुढाकार घेऊन अभ्यासक्रमाची आखणी करावी, सरकारचा प्रतिनिधी आणि विभागाचा मंत्री या नात्याने आपण या पुढाकारास पूर्ण न्याय देऊ. तसेच व्यंगचित्रकार शि.द.फडणीस यांना महाराष्ट्र भूषण आणि पद्म पुरस्कार मिळावा यासाठी देखील आपण प्रयत्न आणि शिफारस करू.
पुरस्काराला उत्तर देतांना व्यंगचित्रकार शि.द.फडणीस म्हणाले की, राजकारणतले विशेष मला काही कळत नाही. परंतु सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही चालले आहे ते तर अगदी समजण्या पलिकडचे आहे. चित्र ही एक भाषा आहे, या क्षेत्रात विविध प्रवाह असले तरी चित्रकलेची भाषा एकच असून राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून शब्द विरहीत सुसंवाद साधला जातो. ऑन लाईनच्या या काळात स्केचबुक मधील रेषा पुसट न होता तरुण चित्रकारांनी ती अधिका अधिक बळकट करावी, अशी अपेक्षा फडणीस यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी फडणीस कुटुंबियांच्या वतीने शंभर दिव्यांनी कौटुंबिक औक्षण करण्यात आले. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील प्रातिनिधीक स्वरुपात शिदं चा सत्कार केला. ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत ,प्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले, महोत्सवाचे स्वागताध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे मुख्य कार्यकारी संचालक कृष्णकुमार गोयल, सुहृद होम्स अँड हॉलिडेज, पुणेचे सहसंस्थापक मकरंद केळकर, स्किन सिटीचे संचालक डॉ .नितीन ढेपे आदींनी यावेळी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महोत्सव संयोजक वसुंधरा क्लबचे वीरेंद्र चित्राव, कार्टूनिस्ट्स कम्बाईनचे संजय मिस्त्री यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार स्नेहल दामले यांनी व्यक्त केले. हा महोत्सव पुण्यासह मुंबई, ठाणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, इंदूर, बडोदा, बंगळुरू, हैदराबाद, दिल्ली, अहमदाबाद, पणजी, फोंडा/मडगांव, जळगाव, सांगली,मिरज, रत्नागिरी, छ. संभाजीनगर, सोलापूर, अमरावती, यवतमाळ, पिंपरी-चिंचवड, बेळगाव, चंद्रपूर, अहिल्यानगर अशा विविध ठिकाणी घेण्याचा संयोजकांचा मानस आहे.
न्युज अनकट प्रतिनीधी : जयश्री बोकील