टाळीची सशर्त तयारी

13
Raj and Uddhav Thackeray alliance
टाळीची सशर्त तयारी

न्यूज अनकट प्रतिनिधी,भागा वरखाडे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्नेहभोजन घेतल्यानंतर काही तासांत मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येण्याची भाषा राज यांनी केली. टाळीसाठी त्यांनी हात पुढे केला, त्याला उद्धव ठाकरे यांनीही सशर्त प्रतिसाद दिला; परंतु हा राजकीय डावपेचाचा भाग आहे, की परिस्थितीमुळे खरेच दोघे भाऊ एकत्र येतात, हे समजण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल.

महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांना घेऊन शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसेने एकत्र यावे, अशी भूमिका आतापर्यंत अनेकांनी जाहीरपणे व्यक्त केली. दोघा ठाकरेंचे मामा चंदूमामा यांनी त्यासाठी प्रयत्न केले. राज्यातील सामान्य कार्यकर्त्यांनी दोन्ही ठाकरेंना एकत्र येण्याचे आवाहन केले; मात्र एकत्र येण्याच्या या चर्चेवर भाष्य करण्यास आतापर्यंत दोघांनीही कायम टाळाटाळ केली; मात्र आता राज ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी हात पुढे केला. उद्धव यांनीही वेळ न दवडता टाळीसाठी हात पुढे केला. एका मुलाखतीत उद्धव आणि राज अजूनही एकत्र येऊ शकतात का? असा थेट सवाल महेश मांजरेकर यांनी राज यांना विचारला. त्यावर “कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडणे किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणे, एकत्र राहणे यात फार कठीण गोष्ट वाटत नाही. विषय फक्त इच्छेचा आहे, कारण हा माझ्या एकट्याचा विषय नाही.

माझे म्हणणे आहे, की सर्व राजकीय पक्षातील सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा.”असे म्हटले आहे. याचा अर्थ दोघांनी एकत्र येण्यापुरता मर्यादित नाही, तर सर्वंच मराठी माणसांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यात आहे. ते प्रत्यक्षात येण्याची शक्यता तशी धुसर आहे. बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार हा माझा विचार होता. मी बाहेर पडलो, त्यावेळचा हा माझा विचार आहे; पण मी शिवसेनेत होतो तेव्हा उद्धवबरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती; पण समोरच्याच्या मनात आहे का, मी त्यांच्याबरोबर काम करावे? असा सवाल करताना लहान-मोठ्या गोष्टींत मी माझा इगो आणत नाही, असे म्हणत राज यांनी उद्धव यांना पुन्हा एकदा टाळी दिली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकत्र येण्याकरता राज यांनी साद दिल्यानंतर उद्धव यांनीही प्रतिसाद दिला.

“आमच्यात भांडण नव्हतेच; पण तरीही आमच्यातील भांडणे मिटवून टाकल्याचे मी जाहीर करतो. सर्व मराठी माणसांनी ठरवायचे, की भाजपबरोबर जायचे की माझ्याबरोबर यायचे. मग काय द्यायचाय त्या तो पाठिंबा बिनशर्त द्या. महाराष्ट्राचे हीत ही एकच शर्थ माझी आहे”, असे उद्धव म्हणाले. उद्धव यांनी घातलेली अट मनसेच्या नेत्यांना फारशी पसंत पडलेली नाही, असे त्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसते आहे; परंतु दोन भावांनी एकत्र यावे, अशी शिवसेनेच्या ठाकरे गटाची आणि मनसेच्या सैनिकांची इच्छा आहे.

महाराष्ट्र धर्म, मराठी यावरून सध्या राज्यातील वातावरण तापले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील सक्तीच्या हिंदी धोरणाचा वेगळा इफेक्ट राज्याच्या राजकारणात दिसून आला. कायम एकमेकांविरोधात तोफ डागणारे दोन पक्षाच्या नेतृत्वाने अचानक मनोमिलनाचे संकेत दिले आहे. राजकारण केव्हा आणि कसे कूस बदलेल हे सांगता येत नाही. आता तर ‘मौका भी है और दस्तूर भी है’ असे वातावरण आहे. राज यांनी उद्धव यांना साद घातल्यानंतर त्यांनीसुद्धा अटी-शर्तींच्या आडून महाराष्ट्राच्या हितासाठी प्रतिसाद दिला. राज आणि उद्धव एकत्र येण्यामागची कारणीमीमांसा करण्यात येत आहे, तर त्याच्या परिणामांची आणि बदलत्या राजकीय समीकरणांचा ऊहापोह पण होत आहे. उद्धव यांच्या राजकीय प्रवासात जून २०२२ मध्ये मोठे राजकीय वळण आले. कोरोनानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले. एकनाथ शिंदे यांनी बंड केले. पक्षातील आमदार सोबत घेऊन त्यांनी भाजपसोबत युती केली.

त्यासाठी शिवसेना-शिंदे गट अस्तित्वात आला. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतरचे नाट्य आपल्यासमोर आहे. दरम्यान, २०२३ मध्ये निवडणूक आयोगाने शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांच्या गटाला दिले, तर उद्धव गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल चिन्ह दिले. शिवसेना फुटली, चिन्ह गेले. लोकसभेत सरस कामगिरी करणाऱ्या उद्धव गटाला विधानसभेत मोठा झटका बसला. महाविकास आघाडीला जनतेने नाकारले. ‘ईव्हीएम’ मतदानात महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा सुपडा साफ झाला. आता राजकीय अस्तित्वाची निकाराची लढाई पक्षासमोर उभी ठाकली आहे.

राज यांनी दिलेली हाक त्यादृष्टीने महत्त्वाची आहे. मुंबई महापालिका हातची जाऊ द्यायची नसेल, तर मराठीच्या मुद्यावर दोन्ही बंधू एकत्र येऊ शकतात. ही निवडणूक पुढील मोठ्या प्रयोगासाठी लिटमस् टेस्ट ठरू शकते. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या नावावर आणि नवीन चिन्हासह उद्धव विधानसभेच्या निवडणुकीत उतरले होते. खरे तर ही त्यांच्यासाठी अग्निपरीक्षाच होती. उद्धव गटाने राज्यात ९५ जागांवर उमेदवार उभे केले होते; पण त्यांना केवळ वीस जागांवर विजय मिळवता आला. त्यातील दहा जागा मुंबईतील होत्या, तर दुसरीकडे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ८१ जागांवर उमेदवार दिले आणि ५७ जागांवर विजय मिळवला. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनाही अपेक्षित यश आले नाही. त्यामुळे आता मराठी भाषा, महाराष्ट्र या मुद्यावर दोन्ही ठाकरे एकत्र येऊ शकतात.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आलेख गेल्या दोन विधानसभा निवडणुकीपासून सातत्याने घसरली. पक्ष स्थापनेपासून मराठीच्या झंझावातावर मनसेने मोठा विजय मिळवला होता. २००९ मधील निवडणुकीत मनसेने १३ जागांची कमाई केली होती, तर २१४ मध्ये त्यांना एकाच जागेवर समाधान मानवे लागले होते. २०१९  आणि २०२४ च्या निवडणुकीत त्यांना साधे खातेही उघडता आले नाही. लोकसभेत महायुतीला बिनशर्त सहकार्य केले. एकही उमेदवार दिला नाही, तरीही महायुतीने माहिममध्ये मुलाला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे अमित ठाकरे यांचा झालेला पराभव जिव्हारी लागला. या मतदारसंघात उद्धव यांचे उमेदवार महेश सावंत यांनी शिंदे गट आणि मनसेला धक्का दिला. आता मनसेला राजकीय प्रवाहात मोठ्या चमत्काराची गरज आहे. मराठी आणि महाराष्ट्र या मुद्याभोवती राजकारण तापवले, तर मनसे आणि उद्धव ठाकरे गटाला भविष्यात चांगले यश मिळू शकते असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

महापालिका निवडणुका तोंडावर आहे. ही निवडणूक आणखी सहा महिन्यांत होण्याची शक्यता आहे. महायुतीत जागा अधिक मिळणार नाही. तीन बलाढ्य पक्षांच्या तुलनेत कमी जागा मिळतील. त्यामुळे महायुतीच्या पाठी फरफरटत जावे लागेल, ही मनसेची भीती आहे. पक्ष फुटीनंतर उद्धव गट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. २०१७ मधील मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्रित शिवसेनेने ८४ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपने ८२ जागा जिंकल्या होत्या. मनसेला एकही जागा जिंकता आली नव्हती. भाजपने विधानसभेत मोठी झेप घेतली आहे. मुंबईत पक्षाचे मजबूत जाळे तयार केले आहे. त्यामुळे मनसे आणि उद्धव ठाकरे गटासमोर मोठे आव्हान आहे. उद्धव आणि राज या दोन्ही भावांनी एकत्र यावे, ही लोकभावना आहे. एकत्र आल्यानंतर त्याचा महापालिकेत चांगला परिणाम होऊ शकतो, असे जनमत आहे.

सध्या मुंबईत इतर भाषिकांची सुरू असलेली दादागिरी, नित्याचे वाद यामुळे मराठी माणूस नाराजच नाही तर संतापलेला आहे. त्यांना एक चांगल्या पर्यायाची प्रतीक्षा आहे. राज-उद्धव एकत्र आल्यास सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढू शकते. राज्यातील सरकार स्थिर आहे. बहुमताचा मोठा आकडा सरकारकडे आहे. त्यामुळे पक्ष फुटीपासून ते राजकीय अस्तित्व टिकवण्याचे आव्हान उद्धव गटासमोर असेल, तर मनसेला प्रभावाचा परीघ वाढवायचा आहे. त्यासाठी दोन्ही बंधू एकत्र आल्यास पूरक भूमिकेचा फायदा होऊ शकतो. भाजपसारखा आक्रमक आणि राष्ट्रीय पक्ष केंद्रात सत्तेत असतो, त्या वे‍ळी प्रत्येकच राज्यातील प्रादेशिक पक्षांसमोर एक आव्हान निर्माण होते. देशात सर्वत्र आपली सत्ता असावी यासाठी भाजप काम करत आहे. अशा परिस्थितीत प्रादेशिक पक्ष वेगवेगळे लढले, तर फटकाही बसेल आणि आता महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अस्तित्व संपले, तर याचा दीर्घकाळ परिणाम होईल याची जाणीव राज आणि उद्धव यांना झाली असावी.