राजस्थान सरकारची वाटचाल महाराष्ट्रासारख्या संकटाकडं? सचिन पायलट पुन्हा गेहलोत गटाच्या निशाण्यावर

पुणे, 27 जून 2022: राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्यावर हल्ला केल्यानंतर गेहलोत कॅम्प पायलट यांच्यावर आक्रमक बनले. आता गेहलोत यांच्या खास नगरविकास मंत्री शांती धारीवाल यांनी सांगितलं की, आम्ही केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि सचिन पायलट यांची भेट पाहिली आहे. धारीवाल म्हणाले की, अशोक गेहलोत काहीही चुकीचं बोलले नाहीत, ते बरोबर आहेत. सरकार पाडण्यात दोघांचाही सहभाग होता.

दुसरीकडं काँग्रेस कार्यालयात अग्निवीर योजनेच्या विरोधात झालेल्या बैठकीत पत्रकारांनी गेहलोत यांच्या पायलटवरील आरोपांबाबत विचारणा केली, मात्र दीपेंद्र हुड्डा यांनी यावर बोलण्यास नकार दिला, तर प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतसरा यांनी सांगितलं की, सर्व काँग्रेस नेते एकत्र आहेत, 2023 मध्ये विधानसभा निवडणूक लढवणार.

सचिन पायलट यांनी प्रत्युत्तर दिलं नाही

राहुल गांधींनी सचिन पायलट यांच्या संयमाचं कौतुक केल्यानंतर गेहलोत यांनी पायलटवर थेट हल्ला चढवल्याने राजस्थानचे राजकारण चांगलंच तापलंय. सचिन पायलट सोमवारी टोंकच्या दौऱ्यावर येत आहेत. अशा स्थितीत त्यांच्यावरील आरोपांवर ते उत्तर देतील, अशी अपेक्षा आहे. दुसरीकडं, पायलट यांनी आपल्या समर्थकांना गेहलोत गटाच्या कोणत्याही चिथावणीला बळी पडू नका असं सांगितलं आहे.

गेहलोत यांनी केला होता असा आरोप

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी समेटानंतर माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर सर्वात मोठा हल्ला केलाय. सीकर जिल्ह्यातील लक्ष्मणगढमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, सचिन पायलट केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यासह काँग्रेस सरकार पाडण्याच्या कटात सामील होते.

राहुल यांनी सचिन यांचं केलं कौतुक

याआधी राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांचं संयम बाळगल्याबद्दल कौतुक केलं होतं. वास्तविक, ईडीने चौकशी केल्यानंतर राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यावेळी सचिन पायलटही उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा