राजमुद्रेचा गैरवापर केल्याप्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा कोणत्याही राजकीय पक्षांनी वापर करणे चुकीचे आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राजमुद्रेचा वापर करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध राजमुद्रेचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने मुख्यमंत्री, मुख्य निवडणूक आयुक्तांसह पोलिसांकडे करण्यात आली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं निमित्त साधून मनसेनं आयोजित केलेल्या महाअधिवेशनात नव्या झेंड्याचं अनावरण केलं. मनसेचा हा झेंडा भगव्या रंगाचा असून, त्यावर राजमुद्रा आहे. याचा विरोध करताना संभाजी ब्रिगेडने म्हंटले आहे की, राजमुद्रेचा वापर कोणत्याही राजकीय पक्षाने करणे चुकीचा आहे. राजमुद्रेचा झेंड्यात वापर करण्याचा कोणताही नैतिक अधिकार राज ठाकरे यांना नसल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. तसेच राजमुद्रेच्या वापरामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संभागी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे. ‘राजमुद्रे’चा गैरवापर करून मताचा जोगवा आम्ही मागू देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला आहे. राज ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करावा असा तक्रार अर्ज पुण्याच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे करण्यात आला आहे.

संतोष शिंदे यांनी फेसबुकवर संभाजी ब्रिगेडची भूमिक स्पष्ट केली आहे. “मनसे भगवा झेंडा स्वीकारणार असेल तर संभाजी ब्रिगेड त्याचं स्वागत करेल. पण या झेंड्यामध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा वापरणार असतील तर संभाजी ब्रिगेडचा त्याला विरोध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे प्रतीक ‘राजमुद्रे’चा वापर केला. ‘राजमुद्रा’ ही महाराजांच्या प्रशासनातील एक प्रशासकीय बाब होती. ही राजमुद्रा जर मनसे राजकारणासाठी आणि मते मागण्यासाठी वापरत असेल तर आमचा एक शिवप्रेमी म्हणून आणि संभाजी ब्रिगेडचा मावळा म्हणून कडवा विरोध असेल. झेंड्यावर मनसे राजमुद्रा छापणार असेल तर महाराष्ट्रातील शिवप्रेमी आणि संभाजी ब्रिगेड हे खपवून घेणार नाही. संभाजी ब्रिगेड स्टाइल विरोध करु. वेळेप्रसंगी आंदोलनेही करु पण मनसेला आम्ही राजमुद्रा राजकारणासाठी वापरु देणार नाही,” असं शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा