राजसाहेब, उद्धवसाहेब आता तरी एकत्र या, शिवसेना भवनासमोर मनसैनिकाची बॅनरबाजीतुन आर्त साद

मुंबई, ३ जुलै २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याने महाराष्ट्रातील जनतेला धक्का बसला आहे. राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीचे सरकार आले आहे. अजित पवार यांच्या निमित्ताने राज्यात नवे राजकीय समीकरण जुळलेले आहे. एकीकडे राज्यात राष्ट्रवादीमुळे राजकारण तापले असताना दुसरीकडे पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचे आवाहन केले जात आहे.

शिवसेना भवनासमोर मनसैनिकाकडून पोस्टर लावत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. आता तरी एकत्र या अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले आहे. महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर मनसे कार्यकर्त्याने शिवसेना भवन परिसरात हे बॅनर लावले आहेत.मनसैनिक लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर लावले आहेत. या पोस्टर्सवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासह राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे.

काल राज्यामध्ये नाट्यमय घडामोडी घडुन, अजित पवार यांनी शिवसेना भाजप सरकार बरोबर आपल्या सहकाऱ्यांसमवेत जाण्याचा निर्णय घेतला. पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही घेतली. त्याच बरोबर त्यांच्या आठ सहकाऱ्यांनाही मंत्री पदाची शपथ देण्यात आली. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देताना म्हटले होते, महाराष्ट्रातील राजकारणाचा चिखल झाला आहे. आता या मनसैनिकांनी घातलेल्या आर्त विनावणीला दोन्ही ठाकरे बंधू काय प्रतिसाद देतात हे पहावे लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा