राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत बैठक

 
कोल्हापूर, ६ सप्टेंबर २०२१: पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी आणि इतर काही मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी काल पदयात्रा काढत जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या पंचगंगा परिक्रमा यात्रेची काल नृसिंहवाडीत सांगता झाली. त्यांच्या या आंदोलनाची राज्य सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राजू शेट्टी यांना बैठकीचे निमंत्रण आहे. आज ३ वाजता वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहेत. 
 
 
पूरग्रस्तांचे प्रश्न आणि मागण्यांचे निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार) राजू शेट्टी यांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले आहे. असे मुख्यमंत्र्यांचे पत्र काल नृसिंहवाडी येथे राजू शेट्टी यांना प्रशासनाकडून सर्वांच्या समक्ष देण्यात आले. इचलकरंजीचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी राजू शेट्टी यांना मुख्यमंत्र्यांचे हे पत्र सादर केले.
 
 
राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात काढलेल्या पदयात्रेत मोठ्या प्रमाणात शेतकरी, कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. पूरग्रस्तांना २०१९ च्या निकषांप्रमाणे मदत मिळावी यासाठी राजू शेट्टी यांनी हे आंदोलन उभं केलं आहे. दरम्यान काल नृसिंहवाडी येथे जलसमाधी घेणार असल्याचा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिलेला होता. त्यानुसार काल काही कार्यकर्त्यांनी नदीपात्रात उड्या देखील मारल्या मात्र त्यांना पोलिसांनी तत्काळ बाहेर काढले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो कार्यकर्ते आणि शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
 
 
नृसिंहवाडी येथे सभा सुरू होण्यापूर्वी इचलकरंजीचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी राजू शेट्टी यांची भेट घेऊन त्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांचे पत्र सादर केले. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी राजू शेट्टी यांच्यासमवेत आज दुपारी तीन वाजता वर्षा शासकीय निवासस्थानी बैठकीचे आयोजन केले असल्याचे नमूद केलेले आहे.
 
 
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा