राज्याच्या काही भागात दमदार पाऊस

वाशिम, ११ ऑगस्ट २०२० : राज्याच्या काही भागात कालपासून दमदार पाऊस पडत आहे. वाशिम जिल्ह्यात काल संध्याकाळपासून काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी संततधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक पर्जन्यमानाच्या ९१ टक्के पाऊस झाला असला तरी अनेक सिंचन तलावांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही. मात्र काल रात्रभर झालेल्या पावसानं जलसाठ्यात वाढ होण्याची आशा निर्माण झाली आहे. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणारा एकबुर्जी प्रकल्प या वर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच तुडुंब भरला असल्यानं, तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागलं आहे.

जालना शहरासह जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे.
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून कोयना धरणात काल रात्री ११ वाजता ७४ पूर्णांक ६६ शतांश टि एम सी (TMC) इतका पाणीसाठा झाला होता.

नांदेड जिल्ह्यात काल रात्री संपलेल्या २४ तासांपैकी २० तासापेक्षा जास्त काळ संततधार पाऊस पडला.
परभणी शहरासह जिल्ह्यात काल दिवसभर आणि रात्रीही पाऊस पडला. या पावसामुळे शेतीला लाभ होईल अशी आशा निर्माण झाली आहे.

लातूर जिल्ह्यात काल दिवसभर पावसाची भुरभर सुरू होती. तर संध्याकाळी चांगला पाऊस पडला. हा पाऊस खरीपाच्या पिकासाठी लाभदायक असून सोयाबीनच्या पिकाला जीवदान मिळणारआहे.
बुलडाणा जिल्ह्यात संततधार पाऊस पडत आहे. खडकपूर्णा धरणातून पाणी सोडलं जात असून हे पाणी परभणी जिल्ह्यातल्या येलदरी धरणात येत आहे. येलदरी धरणात ९१ पूर्णांक ३५ शतांश टक्के, तर सिध्देश्वर धरणात ६४ पूर्णांक ४२ शतांश टक्के पाणीसाठा आहे. येलदरी धरण भरून वाहण्याची शक्यता असून, धरणाचं पाणी पूर्णा नदीत सोडलं जाईल. त्यामुळे पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा द्यावा, अशी सूचना पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सं. बा. बिराजदार यांनी नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्हा प्रशासनाला दिली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवस सर्वत्र पाऊस पडत असल्यानं भंडारा जिल्ह्यातल्या गोसेखुर्द धरण्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. काल संध्याकाळी ७ वाजता धरणाचे १४ दरवाजे अर्धा मीटरनं, तर १९ दरवाजे एक मीटरनं उघडले असून, त्यातून ५ हजार ७०२ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु असल्याची माहिती जिल्हा पूर नियंत्रण कक्षानं दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा