मुंबई, दि. २७ मे २०२०: राज्यात २४ मार्च पासून लॉकडाउन सुरू करण्यात आले आहे. याकाळात जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतर सर्व गोष्टी बंद करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये मद्यविक्रीचा देखील समावेश होता. महसूलात होणारा तोटा भरून काढण्यासाठी राज्य सरकारने विक्रीस परवानगी दिली होती. मात्र यानंतर दुकानांवर प्रचंड प्रमाणात गर्दी होण्यास सुरुवात झाली होती त्यावर उपाय म्हणून राज्य सरकारने ऑनलाइन विक्रीसाठी परवानगी दिली होती. त्यानंतर १५ मे २०२० पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे.
▫️३,८३,३८३ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री
१५ मे २०२० ते काल २६ मे २०२० या काळात ३ लाख ८३ हजार ३८३ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. काल दिवसभरात ५१ हजार ७२८ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात २८ हजार ५६६ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.
मद्यविक्रीसाठी राज्य सरकारने काही अटींसह परवानगी दिली. त्यानंतर राज्यात एकूण १०,७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती (परवाना) पैकी ७,१५२ अनुज्ञप्ती सुरू आहेत. राज्य शासनाने ३ मे, २०२० पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. राज्य सरकारने दि.१५/५/२०२० पासून ऑनलाईन मद्य विक्री करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर राज्यात सर्वत्र (कंटेनमेंट झोन वगळता) ऑनलाइन मद्य विक्री सुरू करण्यात आली आहे.
▫️कुठे मिळेल परवाना
ऑनलाइन मद्य विक्री करता यावी म्हणून राज्य सरकारने त्यासंबंधित परवाना मिळण्यासाठी एक संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळावरून आपण ऑनलाइन मद्य विक्रीसाठी परवाना मिळू शकतो. aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरून आपण ऑनलाईन मद्य विक्रीसाठी परवाना मिळवू शकताे, तसेच कोणाला ऑनलाईन परवाना घ्यायाचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्कविभागाच्या सर्व अधीक्षक/निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने ऑफलाइन पध्दतीने सुध्दा उपलब्ध आहेत. सदर मद्यसेवन परवाने एक वर्षाकरीता रु.१००/- किंवा आजीवन परवान्याकरिता रु.१,०००/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी