अमरावती: देशभरात बेरोजगारीच्या प्रश्नाने उग्र रुप धारण केलेले असताना, रोजगाराबाबत राज्य सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. गृह खात्यातील रिक्त पदे भरण्यासाठी शासन प्रयत्नरत असून, सात ते आठ हजार पदांसाठी लवकरच पोलीस भरती केली जाणार आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सोमवारी दर्यापूर येथे सांगितले.
या पोलीस भरतीमुळे राज्यातील पोलिसांवरील ताण काही प्रमाणात कमी होणार असल्याची चर्चा आहे. लोकनेते स्व. जे. डी. पाटील उपाख्य बाबासाहेब सांगळूदकर यांच्या ५१ व्या पुण्यतिथीनिमित्त दर्यापूर येथील श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात कायदा आणि सू व्यवस्था सुरळीत चालू राहण्यासाठी पावले उचलणार आहे. अवैध सावकारी, नक्षलवादाला पायबंद घालण्यासाठी तरतुदी व त्यासंबंधित उपाययोजना आखण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.केवळ पोलीस भरती नाही तर विविध स्पर्धा परिक्षांसाठी ग्रामीण भागातील तरुणांनी अभ्यासात सातत्य ठेवत तयारी करायला हवी असे आपले विचार ही त्यांनी व्यक्त केले. राज्यात वाढत चाललेल्या महिला अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी राज्य सरकार ठोस निर्णय घेणार आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येबाबत गृहमंत्री देशमुख यांनी चिंता व्यक्त केली. पालकांनी आपल्या मुलांवर अवास्तव अपेक्षांचे ओझे लादू नये असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष शरद तसरे, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री रणजित देशमुख, आदी यावेळी उपस्थित होते.