इस्लामाबाद, १७ नोव्हेंबर २०२०: पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या डोळ्यावरील झोप उडवली आहे. विरोधी पक्षांनी दररोज मोर्चे काढून सरकारला गोत्यात आणलं आहे. यादरम्यान, इम्रान यांनी गिलगिट बाल्टिस्तानमध्ये निवडणुका घेऊन आपल्या कारकिर्दीतील उरलं सुरलेलं कार्यदेखील पूर्ण केलं आहे. इम्रान खान यांनी निवडणुका घेण्याच्या निर्णयाला गिलगिट बाल्टिस्तान भागातील लोक तीव्र विरोध करत आहेत. गिलगिट बाल्टिस्तानमधील सरकारविरोधी लाटेनं घाबरून इम्रान खान यांनी आता नवीन युक्तीचा प्रयत्न केलाय.
गिलगिट बाल्टिस्तान प्रदेशातील निवडणुकीच्या निकालांच्या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी सोमवारी सभा आणि रॅली वर बंदीची घोषणा केली. हे निर्बंध का लावले गेले आहेत हे जगजाहीर आहेच, पण इम्रान खान यांच्या सरकारने या निर्बंधांचं कारण कोरोनाव्हायरसचा प्रसार होण्याचं सांगितलं आहे. नॅशनल कोऑर्डिनेशन कमिटी (एनसीसी) च्या कोरोना विषाणू विषयी झालेल्या बैठकीनंतर देशाला संबोधित करतांना इम्रान यांनी गिलगिट बाल्टिस्तानमधील निवडणुकांच्या वेळी सभा आणि रॅली वर बंदी आणण्याची घोषणा केली.
न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्तानुसार, इम्राननं या निर्णयाच्या मागं कोरोनाच्या दुसर्या लाटेचा हवाला दिला. देशाला संबोधित करताना इम्रान म्हणाले की, कोविड -१९ च्या दुसर्या लाटेच्या वाढत्या घटनांचा आम्ही आढावा घेतला आहे … संपूर्ण जगात, विशेषत: युरोप आणि अमेरिकेत हे पाहण्यास मिळत आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी सभा आणि मोर्च्यांवर बंदी घातली जात आहे. दरम्यान, इम्रान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ वर विरोधी पक्षांनी निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप केलाय.
वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, पीटीआय पक्षानं गिलगिट-बाल्टिस्तानमधील विधानसभा निवडणुकीत २३ पैकी आठ जागा जिंकल्या आहेत. मतमोजणीत त्यांचा पक्ष एका जागेवर आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत गिलगिट बाल्टिस्तान प्रांताच्या नागरिकांनी इम्रान खान यांना तीव्र विरोध केला आहे. असं असताना देखील त्यांचा पक्ष निवडणुकीत विजय होणं हे नक्कीच प्रश्नचिन्ह उपस्थित करते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे