मंत्रीमंडळ विस्ताराच्या तोंडावर रामदास आठवलेंकडून, मंत्रिमंडळामध्ये एक मंत्रीपद आणि विधान परिषदेच्या एका जागेची मागणी

मुंबई, १२ जुलै २०२३ : अजित पवार सत्तेत सहभागी झाले आणि मंत्रिमंडळ विस्तार झाला. परंतु अजूनही मंत्रीपदाकडे आस लावून बसलेल्या शिवसेना आणि भाजप मधील आमदारांना मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होतो याचे वेध लागले आहेत. त्यातच काल सुप्रीम कोर्टाकडून विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांवर नियुक्तीसाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु आता महायुतीतील घटक पक्षांकडून त्यांच्या मागण्या समोर येत आहेत.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलै पासून सुरू होणार आहे. त्याच्याआधी खाते वाटपासह तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावरून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सोमवारी मध्यरात्री खलबत रंगली होती. तर आताही भाजपच्या कोट्यातील काही मंत्रिपद ही अजित पवार गटाला देण्यात येणार असे कळत आहे.

परंतु आता यावरून शिंदे गटासह भाजपमधील आमदारांमध्ये नाराजी दिसत आहे. असे असतानाच आता मंत्रिमंडळ विस्तारावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपकडे मोठी मागणी केली आहे. आठवले यांनी मंत्रीमंडळ विस्तारात आरपीआयला एक मंत्रिपद आणि राज्यपाल नामनिर्देशित १२ सदस्यांमध्ये आरपीआयच्या एका सदस्याची वर्णी लावावी अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेची आठवन करून देताना आम्हाला ७ विधान परिषदेच्या जागा मिळत होत्या असे म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा