रामजी पांगेरा

दिलेरखान सुमारे तीस हजार पठाणी फौज घेऊन बऱ्हाणपुराहून निघाला आणि नाशिक जिल्ह्यात घुसला.
या भागातील अनेक किल्ले मराठ्यांनी कब्जात घेतलेलेहोते. त्यातीलच कण्हेरा गड या नावाचा डोंगरी किल्ला
मराठ्यांच्या ताब्यातहोता. दिलेरखान हा कण्हेरा घेण्यासाठी सुसाट निघाला. दिलेर हा अत्यंतकडवा आणि हट्टी असा सरदार होता.
कण्हेऱ्याच्या परिसरातच सपाटीवर महाराजांचा एक जिवलग शिलेदार अवघ्या सातशे मराठी पायदळानिशी तळ ठोकून होता.
कारण मोगलांच्या फौजा केव्हा स्वराज्यात घुसतील याचा नेम नव्हता. म्हणून ही सातशेची तुकडी गस्तीवर राहिली होती. या तुकडीचा नेता होता रामाजी पांगेरा.

हा रामाजी विलक्षण शूर होता. प्रतापगडच्या युद्धात अफझलखानच्या सैन्याविरुद्ध जावळीच्या जंगलात या वाघाने भयंकर
थैमान घातले होते. (दि. १० नोव्हेंबर १६५९ ) त्याने पराक्रमाची शर्थ केली. तो हा रामाजी पांगेरा कण्हेऱ्यापाशी होता.
एक दिवस दिवसाउजेडी त्याला हेरांनी खबर दिली की , औरंगजेबाचा खासा सरदार दिलेरखान पठाण भलं मोठं घोडदळ
घेऊन कण्हेऱ्यावर चालून येत आहे. दिलेरची फौज खरोखरच मोठी होती. त्याच्यापुढे रामाजीची फौज चिमूटभरच होती.
ही खानाच्या आक्रमणाची खबर मिळताच खरे म्हणजे रामाजीने आपल्या सैन्यानिशी शेजारच्याच आपल्या कण्हेरा गडावर
जाऊन बसायला हरकत नव्हती. ते सोयीचे आणि निर्धास्त ठरले असते. पण रामाजी पांगेऱ्यातला वाघोबा चवताळून उठला.
तो आपल्या चिमूटभर मावळ्यांपुढे उभा राहीला.

दिलेरखान मोठ्या फौजेनिशी चालून येतोय हे त्या चिमुकल्या मराठी तुकडीला समजलेच होते. रामाजी आपल्या लोकांच्या पुढे उभा राहिला आणि मोठ्या आवेशात तो गरजला , ‘ मर्दांनो , खानाशी झुंजायचंय  जे जातीचे असतील , ( म्हणजे जे जातिवंत योद्धे असतील ते) येतील. मर्दांनो , लढाल त्याला सोन्याची कडी , पळाल त्याला चोळी बांगडी ‘ असे बोलून रामाजीने आपल्या अंगावरचा अंगरखा काढून फाडून फेकला. डोईचे मुंडासेही फेकले. अन् दोन्ही हातात हत्यारे घेऊन त्याने एकच हरहर केला. साक्षात जणू भवानीच संचरली. अवघ्या मराठी सैन्यानेही तसेच केले.

मूतिर्मंत वीरश्रीने कल्लोळ मांडला. उघडे बोडके होऊन मराठी सैन्य भयभयाट करू लागले. अन् दिलेरखान आलाच…
वणव्यासारखे युद्ध पेटले. तलवारबाजीने दिलेरखान थक्कच झाला. त्याला पुन्हा एकदा पुरंदरगड अन् मुरारबाजी देशपांडा
आठवला. झुंज शथीर्ची चालली होती. पण मराठ्यांचा आणि रामाजीचा आवेश दारूच्या कोठारासारखा भडकला होता.
अखेर हट्टी दिलेर हटला. त्याचे सैन्य पळत सुटले. दिलेरलाही माघार घ्यावी लागली. रामाजी पांगेऱ्याने दाखवून दिले की ,
मराठीयांची पोरे आम्ही , भिणार नाही मरणाला. चिमूटभरांनी परातभरांचा पराभव केला.

कण्हेरा गडाला दिलेरखानची सावलीही शिवू शकली नाही. अशी माणसं महाराजांनी मावळ मुलखातून वेचून वेचून मिळविली होती. त्यातलाच हा रामाजी पांगेरा. इतिहासाला त्याचं घर माहीत नाही , त्याचं गाव माहीत नाही , त्याचा ठाव
माहिती नाही.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा