हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते. त्यांची नेमणूक इ.स. १६७४ साली झाली.
हंबीररावांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता. त्यांना निजामशाहीने “बाजी” हा किताब दिला होता. मोहिते घराण्यातील पराक्रमी पुरुष तुकोजी मोहिते हे तळबीड या गावची पाटीलकी सांभाळत होते. या घराण्याने घाटगे आणि घोरपडे घराण्यांशी सोयरीक जुळवून आणली. याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातील संभाजी व धारोजी मोहिते यांचा सम्बन्ध येऊन धारोजी शहाजीराजांच्या लष्करात सामील झाले. संभाजी मोहिते व धारोजी मोहिते त्या काळातील प्रराक्रमी सेनानी होते. त्यांच्या शौर्याची गाथा आदिलशाही फर्मानामध्ये पहावयास मिळते.
स्वराज्याच्या स्थापनेवेळी संभाजी मोहिते हे शहाजी राजेंच्या लष्करात सहहवालदार होते. तेे पुढे कर्नाटकला गेले मात्र त्यांनी आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजाशी लावून दिला व भोसले घराण्याशी पुन्हा नाते निर्माण केले. पुढे संभाजी मोहिते यांचा मुलगा हंसाजी मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराज पुत्र राजाराम महाराजांशी लावून दिला. त्यामुळे मोहिते घराणे हे छत्रपती शिवाजीराजांच्या अगदी जवळचे घराणे झाले.
यातील संभाजी मोहितेचा मुलगा म्हणजे हंसाजी ऊर्फ हंबीरराव मोहिते.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणून नेमले. बहलोलखानाशी लढताना प्रतापराव गुजर २४ फेब्रुवारी १६७४ रोजी मरण पावल्याने हंबीररावांची त्यांच्या जागी नेमणूक झाली.
महाराजांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई या हंबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या. हंबीररावांच्या कन्या महाराणी ताराबाई ह्या राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या.
ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले तेव्हा हंबीररावांनी आदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला.शत्रूला विजापूरपर्यन्त पिटाळून लावण्यात हंबीररावांचे मोठे योगदान आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर मोगल सुभेदार दिलेरखान व बहादूरखान यांच्या छावण्यावर हल्ला करण्याचा आदेश हंबीररावांना दिला. ही स्वारी यशस्वी करून त्यांनी खानदेशातील मोगलांच्या खानदेश, बागलाण, गुजरात, बऱ्हाणपूर, वऱ्हाड, माहूड, वरकड पर्यन्तच्या प्रदेशांत धुमाकूळ घातला. यानन्तर (सन १६७६) सरसेनापती हंबीररावाने कर्नाटकातील कोप्पल येथील आदिलशाही पठाणी सरदार हुसेनखान मियाणाचा येलबुर्गा येथे मोठा पाडाव करून त्याच्या जुलमातून रयतेची मुक्तता केली. सरसेनापती हंबीररावांच्या तलवारीची कमाल या विषयीचे वर्णन बखरीतून आलेले आहे. (अशीच एक तलवार प्रतापगडावरील भवानी मातेच्या मन्दिरात आहे. तिच्यावर सहा चरे पाडलेले आहेत. त्या तलवारीवर ‘ कान्होजी मोहिते हंबीरराव’ अशी अक्षरे सोन्यामध्ये कोरलेली आहेत. याचा अर्थ असा की ही तलवार हंबीरराव मोहित्यांची नसून हम्बीरराव ‘किताब असणाऱ्या कान्होजी मोहिते नामक वीराची आहे. परन्तु जनमानसात असा समज आहे की ती तलवार ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते’ यांची आहे.)
हुसेनखानाला कैद करून सेनानी धनाजी जाधव व सरसेनापती हंबीरराव मोहिते हे छत्रपतीना गोवळकोण्ड्यात भागानगर येथे येऊन मिळाले. यानन्तर महाराजांना आपले बन्धू व्यंकोजीराजें बरोबर सामोपचाराने चांगले सम्बन्ध निर्माण करावयाचे होते. मात्र व्यंकोजीची भेट यशस्वी झाली नाही. पुढे महाराजांनी कर्नाटकातील मोहीम आटोपती घेतली आणि ते महाराष्ट्रात आले. हंबीरराव मात्र नन्तर सन १६७८ मध्ये महाराष्ट्रात आले.त्यानन्तर महाराजांनी लहान पुत्र राजाराम महाराजांचा प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईशी विवाह घडवून आणला. त्यानंतर अवघ्या दहा ते बारा दिवसांनी छत्रपती शिवाजीराजांचे निधन झाले. यावेळी हंबीरराव कऱ्हाड परिसरात छावणी टाकून होते.
मोहिते घराण्याच्या इतिहासाला ज्ञात असलेला पुरुष म्हणजे रतोजी मोहिते .शिवाजी महाराजांच्या मृत्यूनन्तर संभाजी राजेंना छत्रपतीपदावर न बसविता राजाराम महाराजांचे मंचकारोहण केल्याची बातमी कळताच संभाजी राजांनी आपल्या सर्व किल्लेदार व अधिकारांना आपल्या पायाशी रुजू होण्याचे आदेश सोडले. हे आज्ञापत्र सरसेनापती हंबीररावांनाही मिळाले होते. हंबीररावांनी संभाजी राजांचीच सेवा करण्याचा निर्णय घेतला.
संभाजी राजेंच्या राज्याभिषेकानन्तर त्यांच्या आदेशानुसार विविध आघाड्यांवर हंबीररावांनी आपला पराक्रम गाजवला त्यापैकी बऱ्हाणपूरच्या विजयात त्यांनी मिळवलेली प्रचंड लूट महत्त्वाची आहे. या विजयाने मोगलांची नाचक्की झाली. त्यानन्तर मोगल सरदार शहाबुद्दीनखान उर्फ़ गाजीउद्दीखान बहादुर याच्यावरील हंबीररावांची स्वारी महत्त्वाची आहे. खान रामसेज किल्ल्याला वेढा देऊन होता, त्यावेळी हंबीररावांनी त्याच्यावर हल्ला करून पराक्रम गाजवला. या वेढ्यात हंबीरराव जखमी झाले होते. यानन्तर पुढे संभाजी राजांच्या आदेशानुसार भीमा नदीच्या परिसरातून मोगल सरदार कुलीचखान व पन्हाळा परिसरातून शहाजादा आज्जमला पिटाळून लावण्यासाठी हंबीररावांनी शर्थीचा यशस्वी प्रयत्न केला. त्यानन्तर कल्याणजवळ रहुल्लाखान व बहाद्दुरखानाचा पराभव केला. सन १६८८ मध्ये रायगडाजवळ हंबीररावांनी गाजीउद्दीन खानाबरोबर दोन हात केले या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले. यानन्तरच्या कालखण्डात खुद्द सम्भाजीराजेंच्या बरोबर अनेक मोहिमेत हंबीररावांचा मोठा सहभाग होता. सरसेनापती हंबीररावांची शेवटची लढाई झाली ती वाईजवळ. या युद्धात मोगल सरदार सर्जाखानाचा पराभव झाला परन्तु हंबीररावांना तोफेचा गोळा लागून ते धारातीर्थी पडले.
या हम्बीरराव मोहिते यांची समाधी कऱ्हाड तालुक्यातील तळबीड (जिल्हा सातारा) येथे आहे.
त्यांचें मूळ नांव हंसाजी मोहिते असे असून इसवी सन १६७४ पावेतों हे छत्रपती शिवाजी महाराजाच्या सैन्यांत पांच हजार फौजेवरील एक सरदार होते. परन्तु त्या वर्षी विजापूरच्या सैन्यावर शिवाजी महाराजाचे मुख्य सेनापति प्रतापराव गुजर तुटून पडले असतां त्यांच्या प्राणास मुकून त्याची फौज फुटली. तेव्हां त्याने पाठलाग करणाऱ्या शत्रूच्या सैन्यावर हल्ला करून मोगलांचा पराभव केला म्हणून शिवाजीने त्यावर खूश होऊन यांस हंबीरराव’ असा किताब दिला; व प्रतापरावाच्या जागीं यास सेनापति नेमलें. १६७५ सालीं हंबीररावानें बऱ्हाणपुरावरून थेट माहूरपर्यन्त मोंगलांचा मुलूख लुटला, व भडोच जिल्ह्यातून खण्डणी गोळा करून सर्व पैका रायगडास सुरक्षित आणला.
पावसाळा संपल्यावर तो पुन्हां मोंगलांच्या मुलुखांत शिरला व त्याचें बरेंच नुकसान केलें. पुढच्या वर्षी यादगिरीजवळ हुसेनखान मायणाचा पराभव केला व पुष्कळ लूट मिळविली. इ.स . १६७८ त छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकांतून महाराष्ट्रांत परत आले तेव्हां त्यांनी हंबीररावास व्यंकोजीजवळ ठेविलें होतें. तेथें त्याची व व्यंकोजीची एक लढाई झाली होती. शिवाजी व व्यंकोजी यांच्यामध्ये तडजोड झाल्यावर हंबीरराव मोठ्या त्वरेनें महाराष्ट्रांत यावयास निघाला. मार्गात त्यानें कृष्णा व तुंगभद्रा यांच्या दुआबांत विजापूरच्या सैन्याचा पराभव केला, व सर्व दुआब प्रान्त आक्रमण करून कित्येक बण्डखोर देशमुखांस वठणीस आणलें (१६७८). इ. स. १६७९ त शिवाजीनें मोंगलांकडे पळून गेलेल्या संभाजींचा पाठलाग करण्याकरितां याची रवानगी केली. परन्तु संभाजी दिलेरखानाच्या छावणींत पोंचल्याचें कळल्यावर यास विजापुराकडे मोंगलाविरुद्ध आदिलशहाच्या कुमकेस पाठविलें.
कांहीं दिवसांनीं हंबीररावानें मोंगल रणमस्तखान याला गाठून त्याचा पराभव केला. यानन्तर हंबीरराव विजापुरास आला, व वेढा देऊन बसलेल्या दिलेरखानाच्या सैन्याभोंवतीं घिरट्या घालून त्यानें मोंगलांच्या सैन्यांत अन्नाची इतकी टंचाई पाडली कीं, पावसाळा सम्पल्याबरोबर दिलेरखाननें विजापूरचा वेढा उठविला (१६७९).पुढें बऱ्हाणपुरावर हल्ला करून (१६८०) कोल्हापुराजवळ सुलतान शहाअलम याचा हंबीररावानें पराभव केला (१६८०) इसवी स. १६८४ मध्यें औरंगजेबानें आपली छावणी अहमदनगरास आणल्यामुळें खानदेश प्रान्त मोकळा पडला आहे असें, पाहून हंबीरराव अचानक वऱ्हाणपुरास गेला, व त्या शहरीं कित्येक दिवसपर्यंत खण्डणी गोळा करून तो मिळविलेल्या खण्डणीसह त्वरेनें परत आला. येत असतां वाटेंत त्यानें बऱ्हाणपूरपासून नाशिकपर्यन्त मार्गांतील सर्व प्रान्तांत चौथ-सरदेशमुखी वसूल केली. इ. स. १६८७ मध्यें हंबीरराव व मोंगलांना सरदार सरझाखान यांची वाईजवळ लढाई होऊन तीत मोंगलांचा पराभव झाला. परन्तु या लर्ढाईंत हंबीरराव घायाळ होऊन मरण पावले.