मुंबई, २० ऑगस्ट २०२१: शिवसेना कार्यकर्त्यांकडून दूध आणि गोमूत्राने ठाकरे स्मारकाचे ‘शुद्धीकरण’ केल्याचे प्रकरण समोर आले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे तेथे गेल्यानंतर हे करण्यात आले. नारायण राणे हे गुरुवारी दुपारी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर गेले होते. यानंतर, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संध्याकाळी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक ‘शुद्ध’ केले.
नारायण राणे बराच काळ शिवसेनेत राहिले. २००५ साली त्यांनी शिवसेना सोडली. सध्या ते भाजपमध्ये आहेत आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आहेत. गुरुवारी त्यांनी राज्यात जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. भेटीपूर्वी त्यांनी शिवाजी पार्कमध्ये असलेल्या ठाकरे स्मारकाला भेट दिली होती.
शिवसेनेच्या नेत्यांनी केला विरोध
नारायण राणे यांच्या ठाकरे स्मारकाला भेट देण्यास शिवसेनेचे नेते विरोध करत होते. राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंचा (पक्ष सोडून) विश्वासघात केला असा त्यांचा आरोप होता, त्यामुळे त्यांना स्मारकावर जाण्याचा अधिकार नव्हता. राणे तिथे पोहचण्यापूर्वीच शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले होते की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिवंगत बाळ ठाकरे यांच्या स्मारकाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही कारण त्यांनी “शिवसेना तोडून” पक्षाच्या संस्थापकाला खूप वेदना दिल्या होत्या.
राणे हे बाळासाहेबांचे आवडते नेते होते. १९९९ मध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही होते. गेली अनेक वर्षे राणे सातत्याने उद्धव ठाकरे यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवर लक्ष्य करत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राणे आधी शिवसेनेत होते जे नंतर काँग्रेसमध्ये आणि नंतर २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षात (भाजप) सामील झाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे