राणी लक्ष्मीबाई

50

ब्रिटिशांनी राणी लक्ष्मीबाईचा उल्लेख `’हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क’ असा केला. क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता ठरलेल्या या राणीवर अनेक काव्ये, पोवाडे रचले गेले. राणी लक्ष्मीबाईंचे विचार आजच्या काळातही खूप प्रेरणादायी आहेत. राणी लक्ष्मीबाईंच्या ग्वाल्हेर येथील समाधीस्थानावर इ.स. १९६२ मध्ये त्यांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला.
लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मनिकर्णिका होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील धावडशी गावचे होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता.
धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणाऱ्या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत धोंडोपंत बाजीराव पेशवे व नानासाहेब पेशवे आणि जयाजी शिंदे व लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातही प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या.

लक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोषाखात वावरण्याचे ठरवले.
स्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे पूर्वीपासून झाशीच्या ब्रिटिशांशी असणाऱ्या मैत्रीपूर्ण संबंधांवरून राणी लक्ष्मीबाईंना वाटत होते. त्यासाठी लक्ष्मीबाई स्वतः ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या. या पत्रव्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय, बेकायदेशीरपणा आणि खोडसाळपणा उघड केला. एका पत्रात त्यांनी झाशी संस्थान खालसा केले, तर पूर्ण हिंदुस्थानातील लोकांना हळहळ वाटेल. परिणामी हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटिशांबद्दल भरवसा, विश्वास वाटेल का?, अशी शंका व्यक्त करून कंपनीला एक प्रकारचे आव्हान दिले. कंपनी सरकारच्या बेजबाबदार अनैतिक कृत्यांनी व कंपनीच्या अधिकाराला आव्हान देण्याचे धारिष्ट्य करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई या देशातील पहिल्या काही व्यक्तींमधील एक होत्या.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा