रायगड, २७ एप्रिल २०२४ : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील काळिंजेच्या खाडीत दुर्मिळ समुद्री घोडा आढळला आहे. येथील मच्छीमार अनीस फणसोपकर खाडीत मासेमारी करत असताना त्यांना जाळ्यात हा समुद्री घोडा आढळला. खाडीत कोळंबी पकडण्यासाठी पाग टाकलेला असताना, त्या जाळ्यात हा नारंगी रंगाचा समुद्री घोडा मिळून आला.
समुद्री घोडा हा भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित असून तो संरक्षीत प्रजातीमध्ये मोडला जातो. याची माहिती कांदळवन प्रतिष्ठानचे सहाय्यक संशोधक मोहन उपाध्ये यांना कळताच त्यांनी या समुद्री घोड्याची पाहणी करुन फणसोपकर आणि विक्रांत गोगरकर यांच्या मदतीने पुन्हा त्याला खाडीत सोडले.
काळिंजे गावामध्ये १९० हेक्टर क्षेत्रावर कांदळवन असून खाडीच्या मध्यभागी असलेल्या बेटाभोवती दाट कांदळवन आहे. या खाडीत कांदळवनांच्या ११ प्रजाती आढळत असून पक्ष्यांच्या सुमारे ८० हून अधिक प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. तसेच पाणमांजरांचा अधिवास आणि कोल्हे, रानडुकरांचे अस्तिव येथे आहे. त्यामुळे येथील जैवविविधता टिकून आहे.
न्यूज अनकट प्रतिनीधी : गणेश म्हाप्रळक