राष्ट्रपती राजवट लागू करा, महाविकास आघाडी सरकारला ‘नारळ’ द्या!

मुंबई, दि. २५ मे २०२०: महाराष्ट्रातील एकूण घडामोडी पाहता राज भवन हा अलीकडच्या काळात चर्चेचा विषय राहिला आहे. विरोधी पक्षनेत्यांपासून ते सत्ताधारी पक्षापर्यंत सर्वांचे राज भवनामध्ये येणे जाणे सुरू आहे. सध्या महाराष्ट्रातील राज्याचं सत्ताकेंद्र राजभवन झालं की काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. आज सकाळीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर आज 5 वाजता भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांची भेट घेतली.

आज साडेचार वाजता नारायण राणे राज भवनमध्ये राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी गेले होते. “ठाकरे सरकार कोरोना संकट हाताळू शकत नाही. या सरकारची क्षमता नाही. हे सरकार कोरोनाचा सामना करण्यास अपयशी ठरलं आहे. त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी”, अशी मागणी भाजप खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांकडे केली. हे सरकार लोकांचा जीव वाचवण्यास, उदरनिर्वाह करण्यास सक्षम नाही, असा हल्लाबोल राणेंनी केला.

राज्याला आतापर्यंत केंद्र सरकारने भरपूर मदत केली. मात्र तरीही राज्यातील नेते केंद्र सरकारवर नुसती टीका करत आहेत. सरकारी यंत्रणा कशी हाताळावी हे ज्यांना कळतं त्यांनी करावं, मात्र तसं केलं जात नाही. नाचता येईना, अंगण वाकडे अशी महाविकास आघाडी सरकारची परिस्थिती आहे, असा टोला नारायण राणेंनी लगावला.

राज्य सरकार अपयशी ठरत आहे, कोकण असो किंवा उर्वरित महाराष्ट्र तिथल्या कोरोना रुग्णांची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. त्यामुळे केंद्राने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री सरकार चालवण्यासाठी सक्षम नाहीत , त्यांच्याकडे राज्याला महसूल उभा कसा करावा याबद्दल कुठलीच योजना नाही, असा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा