राष्‍ट्रीय मतदार दिन विशेष…

लोकशाही व्यवस्‍थेत मतदार हा अत्यंत महत्त्‍वाचा घटक असतो. लोकशाही व्यवस्‍थेची मतदार ही ताकद असते. त्यामुळेच जागरूक मतदार हे प्रगत लोकशाहीचे द्योतक मानले जाते. त्यामुळे मतदाराला लोकशाहीत अनन्यसाधारण असे महत्व आहे. २५ जानेवारी २०११ पासून राष्‍ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. अर्थात हा मतदानाचा अधिकार मिळाल्याचा उत्‍सव साजरा करण्याचा दिवस आहे.

भारताला स्‍वातंत्र्य मिळाल्यानंतर २५ जानेवारी १९५० रोजी एक स्‍वायत्त संस्‍था म्‍हणून निवडणूक आयोगाची स्‍थापना झाली. देशात निपक्ष व पारदर्शी वातावरणात निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे कार्य आहे. तसेच नवमतदारांना मतदान व्यवस्‍थेत सामावून घेणे. त्यांना ओळखपत्र देणे, त्यांच्यात मतदानाबद्दल जाणीव जागृती निर्माण करणे आदी कार्येही आयोगाला करावी लागतात.
देशात १८ वर्षांच्यावरील व्यक्‍तीला मतदानाचा अधिकार संविधानाने दिला आहे. त्यानुसार नवमतदारांना मतदान व्यवस्‍थेत सामावून घेण्यासाठी निवडणूक आयोग कार्य करते. त्यामुळे आजच्या राष्‍ट्रीय मतदार दिनी निवडणूक आयोगाकडून देशभरात मतदान केंद्रांवरून मतदार जागृती अभियान चालवले जाते.

भारतात मतदानाच्या टक्‍केवारीचे घटते प्रमाण लक्ष्यात घेऊन २०११ पासून २५ जानेवारीला राष्‍ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. तत्कालीन राष्‍ट्रपती प्रतिभा देवीसिंह पाटील यांनी निवडणूक स्‍थापनादिनी हा दिवस साजरा करण्याचा शुभारंभ केला. यंदा १० वा राष्‍ट्रीय मतदार दिवस साजरा केला जात आहे.
मतदानात तरुणांची टक्केवारी आणि जागरूकता वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने सिस्‍टेमॅटिक वोटर्स एज्युकेशन (एसव्‍हीईईपी)ची सुरुवात २००९ मध्ये केली.
त्यानुसार तरुणांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. देशातील ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत जनतेचे प्रतिनिधी निवडले जातात. त्यासाठी मतदार जागरूक असणे गरजेचे असते. ही भूमिका ठरवून निवडणूक आयोग जागृतीचे काम करीत असते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा