..त्यापेक्षा गुजरातला जा; संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई, १६ जानेवारी २०२३ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वित्झर्लंडमधील दावोससाठी रवाना झाले आहेत. दावोस येथे मुख्यमंत्री वर्ल्ड ईकोनिमिक फोरमने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार आहेत. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील लाखो कोटींची गुंतवणूक तुमच्या नाकासमोरुन गुजरात आणि इतर राज्यामध्ये गेली. राज्यातून बाहेर गेलेली गुंतवणूक तुम्ही परत आणली तर तुमच्या दावोसच्या जाण्याला अर्थ आहे. दावोसचे करार कसे होतात आम्हाला माहिती आहे. आतापर्यंत दावोसला जाऊन किती करार झाले आणि किती गुंतवणूक इथे आली याबाबत कुणीही स्पष्ट सांगणार नाही. त्यामुळे दावोसला जाण्यापेक्षा गुजरातला जा, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दावोसच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंतही आहेत. दावोसमध्ये मोठ्या प्रमाणावर करार होणार असून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये २० उद्योगांसोबत १ लाख ४० हजार कोटींचे सामंजस्य करार करण्याचा आमचा प्रयत्न असेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा