आयुष्मान भारत योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या रुग्णालयांना गुणवत्ता आणि दर्जानुसार गुणांकन.

नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट २०२० : आयुष्मान भारत योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या रुग्णालयांना आता त्यांच्या आरोग्यसेवेची गुणवत्ता आणि दर्जानुसार गुणांकन दिलं जाणार आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणानं याबाबतच्या मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत.

वेळेवर उपचार, सुरक्षितता, रुग्णसेवेला दिलं जाणारं प्राधान्य, कार्यक्षमता, परिणामकारकता आणि सर्वांना समान वागणूक या सहा निकषांवर हे गुणांकन आधारित असेल असं प्राधिकरणाचे सहसंचालक डॉ. जे. एल. मीना यांनी सांगितलं. देशभरातली २३ हजारांपेक्षा अधिक रुग्णालयांची आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी झाली आहे.

यात १२ हजार ८२८ सरकारी आणि १० हजारांपेक्षा अधिक खाजगी रुग्णालयं आहेत. आयुष्मान भारत योजनेतून देशातल्या गरीब कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्यविमा देण्यात येतो. गेल्या दोन वर्षात सुमारे १ कोटी १९ लाख लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत उपचार करुन घेतले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा