लातूर, दि.९ जून २०२०: ग्रामीण भागातील लोकांपर्यंत मास्क पुरवठा होण्यासाठी प्रशासनाने रेशन दुकानांतून त्यांना मास्क व सॅनिटायझरचा पुरवठा करावा, मुखपट्टी व भौतिक अंतराच्या संदर्भात जिल्हा परिषदेने त्यांचे प्रबोधन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी (दि.९) रोजी लातूर येथे शासकीय विश्रामगृहावर कोविड-१९ च्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत बोलताना केले.
या बैठकीस पर्यावरण, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन, रोहयो व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, बाजार समिती सभापती ललितभाई शहा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा उपनिबंधक समृत जाधव, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी महेशकुमार मेघमाळे आदी उपस्थित होते.
जि. प. च्या आरोग्य विभागाने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करुन द्यावा तसेच कोविड-१९ च्या अनुषंगाने जिल्ह्यात पुरेसा औषधसाठा ठेवण्याची दक्षता घ्यावी, असेही पालकमंत्री म्हणाले.
जिल्ह्यातील एकही शेतकरी कापूस खरेदीपासून वंचित राहणार नाही याची संबंधितांनी दक्षता घ्यावी, हरभरा-तूर खरेदीबाबत शासनाकडून मुदतवाढ मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, राष्ट्रीकृत बँकांनी पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टाची पूर्तता केलीच पाहिजे, लातूर मनपाने ५० टक्के क्षमतेने शहर बससेवा सुरू करावी, लातूर महापालिका हद्दीतील लोकांसाठी ‘माझी हेल्थ माझ्या हाती’ यापद्धतीचे स्वतंत्र ॲप तयार करावे, आदी निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
न्युज अनकट प्रतिनिधी: