मुंबई २९ जुलै,२०२२ : अभिनेते नसरुद्दिन शहा यांच्याप्रमाणे त्यांच्या पत्नी रत्ना पाठक-शहा कायम वादग्रस्त विधान करत असतात. नुकत्याच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, शिकलेल्या महिलादेखील आपल्या पतीसाठी व्रतवैकल्ये करतात. अशा महिलांवर त्यांनी आक्षेप घेतला आहे. यावेळी त्यांना विचारण्यात आलं होतं की तुम्ही तुमच्या नवऱ्यासाठी उपास करतात का? यावर त्यांनी उत्तर दिले की, मी काय असे उपास-तापास करायला वेडी आहे का…आजही शिकलेल्या महिला आपल्या पतीसाठी उपास करत आहेत. आजच्या जगात विधवा महिला या भयाण आयुष्य जगत आहे. तेव्हा असं आयुष्य आपल्या वाट्याला येऊ नये, यासाठी महिला असे उपास-तापास, व्रतवैकल्ये करतात. आजच्या २१ व्या शतकात आपण असल्या गोष्टींवर भाष्य करत आहोत, यांसारखे दुर्देव नाही. यासाठी रत्ना पाठक यांना ट्रोल करण्यात येत आहे. तसेच त्यांनी माफी मागावी, अशी हिंदूंकडून मागणी होत आहे.
खरं पहायला गेलं, तर रत्ना पाठक-शहा यांचे वक्तव्य अगदी मार्मिक आहे. आजही जिथे आपण पुढारलेले जग म्हणतो, तिथे महिला आजही अनेक त्रासाला सामोरे जात आहे. कामाच्या ठिकाणी त्रास होणे, नवऱ्याकडून शारिरीक आणि मानसिक शोषण, हे आजही शहरात घडत आहे. तसेच गावात तर भयाण स्थिती आहे. राजस्थानच्या एका गावात एका महिलेला घरातील दीर, सासरा आणि नवरा या सगळ्यांशी शरीरसंबंध ठेवावे लागतात, ही भयाण वस्तुस्थिती आहे. दारु पिऊन बायकांना मारणे हा तर पुरुष त्याचा हक्क समजतो. अशा पुरुषासाठी आपण का उपास करावा? हा प्रश्नच आहे.
जिथे आजही स्त्रियांना पायाखालची जागा आहे, असे करणाऱ्या या पुरुषांसाठी का उपास करावा, स्वत:च्या पोटाची कुतरओढ करावी, असा सवाल रत्ना पाठक यांनी उठवला आहे. त्यामुळे आता स्त्रियांनी आपल्या नवऱ्यासाठी उपास करताना त्याचे वागणे पहा आणि मग दहा वेळा विचार करुन ठरवा की, उपास करण्यासाठी आपला पती लायक आहे की ना लायक ?
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस