रयत शिक्षण संस्था दीपस्तंभासारखे कार्य करते: ताराचंद्र आवळे

फलटण, सातारा २५ सप्टेंबर २०२३ : स्पर्धेच्या युगात आपण आपल्या क्षमता ओळखून योग्य क्षेत्राची निवड केली पाहिजे. त्यावर यशापयश अवलंबून असते. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या क्षमता ओळखल्या व जीवनाची जगण्याची दिशा ठरवली. त्यांच्या महान संकल्पनेतून रयत शिक्षण संस्था स्थापन झाली. खेड्यापाड्यातील बहुजनांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली. रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाचा इतिहास थक्क करणारा आहे. महाराष्ट्राला दिशादर्शक शैक्षणिक काम रयतेचे आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून संस्था पदाधिकारी व सर्व सेवक काम करतात. त्याग व समर्पण यावर रयत शिक्षण संस्थेचा पाया आहे असे मत, प्रमुख वक्ते, साहित्यिक व रयत सेवक ताराचंद्र आवळे यांनी रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल सुरवडी तालुका फलटण येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६व्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे पाटील, उपसरपंच विजय खवळे,बाळासाहेब जगताप, शांताराम मोहिते, नितीन जाधव, प्रणित यादव, सूर्यकांत पवार, रणजित साळवे, नेताजी साळवे, सचिन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. ताराचंद्र आवळे पुढे म्हणाले की, बहुजनांच्या लेकरांना योग्य शिक्षण मिळावे म्हणून कर्मवीर आण्णा व त्यांच्या पत्नी सौ लक्ष्मीबाई ऊर्फ वहिनी यांचा त्याग महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. प्राथमिक शिक्षण ते उच्च शिक्षण याचा भक्कम पाया निर्माण केल्यामुळे रयत शिक्षण संस्थेचे आगळेवेगळे स्थान शिक्षण क्षेत्रात आहे. अडचणीच्या काळात रयत शिक्षण संस्था दीपस्तंभासारखी आपले कार्य करत असते.महाराष्ट्राच्या माती बरोबर बहुजनांच्या मुलांच्या बुद्धीचा विकास साधला जातो.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे पाटील म्हणाले की, फलटण तालुक्यातील सुरवडी, चव्हाणवाडी व धूळदेव याठिकाणी हायस्कूल सुरू करताना मोठे योगदान देता आले त्यामुळे या शाळांचा वटवृक्ष बहरलेला दिसतो. रयतेच्या या शाळांमधून गोरगरिबांची मुले मुली शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत याचा अभिमान वाटतो. सुरवडी शाळेची उर्वरित इमारत व संगणक याची पूर्तता लवकरात लवकर पूर्ण केली जाईल असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई ऊर्फ वहिनी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कर्मवीर जयंती निमित्त वक्तृत्व, निबंध, चित्रकला, रांगोळी, पाककला, स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, त्याचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व अहवाल वाचन मुख्याध्यापक राजेंद्र घाडगे यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय साळुंखे यांनी केले तर आभार महेश सोनावले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बबलेश्वर एन. के., रविंद्र सावंत, राजेंद्र गोडसे, आप्पासाहेब मोहिते, सौ.कुदळे डी.व्ही., रोहिदास राऊत यांनी परिश्रम घेतले. यावेळी ग्रामस्थ, आजी- माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा