नवी दिल्ली: यापूर्वी आरबीआयकडून रेपो दरात कपात होत असताना स्टेट बँक ऑफ इंडियासह इतर बँकांनी कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत. त्याचबरोबर मुदत ठेवींसह बचत खात्यांतील रकमेवर देण्यात येणा-या व्याजदरातही कपात केली होती. त्यामुळे रेपो दरातील कपातीकडे बँक ग्राहकांचे लक्ष लागलेले होते परंतु आरबीआयकडून रेपो दरात कपात न करता ५.१५ टक्के कायम ठेवला आहे.
आरबीआयने रेपो दरात या तिमाहीमध्ये कोणताही बदल न करता तो ५.१५ ठेवत रिव्हर्स रेपो रेटही ४.९० टक्के हा पूर्वीएवढाच ठेवला आहे. सर्वसामान्यांना धक्का देणा-या रिझव्र्ह बँकेने मोदी सरकारलादेखील धक्के दिले आहेत. चालू आर्थिक वर्षात विकास दर वाढीचा वेग ६.१ टक्के राहील, असा अंदाज वर्तवणा-या आरबीआयने आता त्यात १.१ टक्क्यांची कपात केली आहे. चालू आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा वेग ५ टक्केच राहील, असा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे. त्यामुळे आर्थिक मंदीचे संकट आणखी गहिरे होण्याची शक्यता आहे. एका बाजूला विकास दर कमी राहील असा अंदाज व्यक्त करणा-या आरबीआयने दुस-या बाजूला महागाई वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. सध्या ३.५ टक्के असलेला महागाई दर ३.७ टक्क्यांवर जाण्याचा अंदाज आरबीआयकडून वर्तवण्यात आला आहे. आर्थिक आघाडीवर संकटात सापडलेल्या मोदी सरकारला आरबीआय रेपो रेट कमी करून काहीसा दिलासा देईल, अशी अपेक्षा होती. मात्र अनेकांची अपेक्षा फोल ठरली.
देशातील अंतर्गत समस्या व आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापार युद्ध यामुळे काही महिन्यांपासून देशात मंदीसदृश्य वातावरण आहे. एप्रिल-जून या तिमाहीत देशाच्या विकास दराचा वेग ५ टक्के इतका होता. जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत त्यात आणखी घट होऊन तो ४.५ टक्क्यांवर आला. गेल्या सहा वर्षांमधील हा निच्चांक आहे. आरबीआयनं रेपो रेटमध्ये बदल न केल्याचा परिणाम लगेचच शेअर बाजारात दिसून आला. काही दिवसांपूर्वी सेन्सेक्स ४१ हजारांवर पोचला होता, परंतु रिझर्व बँकेने रेपो दरामध्ये कोणताही मदर न केल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये ही निराशेचे वातावरण तयार झाले. पतधोरण जाहीर होण्यापूर्वी सेन्सेक्स जवळपास ४१ हजारांवर पोहोचला होता. मात्र पतधोरण जाहीर होताच तो जवळपास २०० अंकांनी खाली आला.