मुंबई, २८ सप्टेंबर २०२०: चलनविषयक धोरण समितीचं (मॉनेटरी पॉलिसी कमेटी) बैठकीचं वेळापत्रक भारतीय रिझर्व्ह बँकेनं (आरबीआय) बदललं आहे. केंद्रीय बँकेनं याबाबत सोमवारी सांगितलं. मंगळवारी एमपीसी’च्या बैठकीच्या वेळापत्रकात बदल झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच लवकरच नवीन तारखांची घोषणा केली जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय बँकेनं एमपीसी बैठकीचं वेळापत्रक बदलण्याचं कारण दिलं नाही. केंद्रीय बँकेनं म्हटलं आहे की, “आर्थिक धोरण समितीची बैठक २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान होणार होती. त्याचा कार्यक्रम बदलण्यात आला आहे. “तज्ज्ञांचं मत आहे की, यावेळी मध्यवर्ती बँकेनं रेपो दरात बदल करण्याची शक्यता कमी आहे. केंद्रीय बँक दर दोन महिन्यांनी चलनविषयक धोरणाचा आढावा घेते.
नुकतच एका वृत्तवाहिनीनं याबाबत सर्वेक्षण केलं होतं. यात सामील झालेल्या २० संस्थांपैकी केवळ बँक ऑफ अमेरिका’नं रेपो दरात ०.१५ टक्के कपात करण्याचा अंदाज वर्तविला आहे. बाकीच्यांचा असा अंदाज आहे की, रेपो दरात केंद्रीय बँक बदल करणार नाही. आरबीआय आपलं चलनविषयक धोरण लवचिक ठेवंल असा त्यांचा विश्वास आहे.
जगभरातील मध्यवर्ती बँका कोरोना विषाणूच्या परिणामामुळं अर्थव्यवस्थेमधील तरलता वाढवत आहेत. भारतातही आरबीआय’नं तरलता वाढविण्याच्या उपाययोजना जाहीर केल्या. दुसरीकडं महागाईचा दर आला आहे. ऑगस्टमध्ये भारतात किरकोळ चलनवाढीचा दर ६.६९ टक्के झाला. जुलैमध्ये तो ६.७३ टक्के होता. महागाई वाढण्याचं कारण म्हणजे पुरवठ्यामध्ये येत असलेल्या बाधा असल्याचं सांगितलं जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे