मुंबई, १३ ऑगस्ट २०२०: जून २०१९ मध्ये स्मार्ट कार्ड योजना महामंडळाने सुरू केली. मात्र आधार जोडणीबाबत गोंधळ, तांत्रिक समस्या, स्मार्ट कार्ड नोंदणी-वाटप प्रक्रियेतील ढिसाळ कारभार यामुळे स्मार्ट कार्डपासून प्रवासी दूरच होता. त्यासाठी ३१ डिसेंबर २०१९ आणि ३१ मार्च २०२० अशी मुदतवाढ महामंडळाकडून देण्यात आली होती. त्यानंतर देखील या मुदतीत महामंडळाने वाढ करत ती १४ ऑगस्टपर्यंत केली होती. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे बऱ्याच नागरिकांच्या स्मार्ट कार्ड नोंदणी राहिल्या होत्या. त्या कारणास्तव महामंडळाने पुन्हा एकदा मुदतवाढ केली आहे.
आता नवीन बदलानुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असून, १ डिसेंबर २०२० पासून ज्येष्ठ नागरिकांना रा.प. प्रवासासाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक असणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी यासंदर्भात माहिती दिली. एसटी महामंडळ प्रशासनाने प्रवाशांना पुर्वी सारखे कागदी पास देण्याऐवजी अत्याधुनिक स्मार्टकार्ड देण्यास सुरूवात केली आहे. या स्मार्ट कार्डवर पासधारकाचे नाव, सवलतीचा तसेच बसचा प्रकार, प्रवासाचे अंतर, प्रवास सवलतीची मुदत अशास्वरूपाची माहिती नमूद असणार आहे.
हे कार्ड संबंधित सवलत धारकाच्या आधार क्रमांकाशी जोडले असल्याने खरं वय समजणे सोपे होईल. प्रवास करताना या कार्डाशिवाय इतर कोणतीही कागदपत्रे दाखविण्याची गरज त्यांना भासणार नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी