बारामती तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी पुन्हा ‘बारामती पॅटर्न’ चा वापर.

बारामती, १४ जुलै २०२० : बारामतीमध्ये शहर व ग्रामीण भागातील कोरोना बाधित व्यक्तींची संख्या वाढू लागली आहे. या विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी बारामती तालुका प्रशासनाने पुन्हा एकदा बारामती पॅटर्नचा अवलंब करावा, असे निर्देश आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.

बारामती विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत बारामती तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, मुख्याधिकारी किरणराज यादव, तहसीलदार विजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर,वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बारामती शहर व तालुक्यातील कोरोना संसर्गावर प्रशासनाने अधिक दक्ष राहून परगाववरून येणाऱ्या व्यक्तींना ‘क्वारंटाईन’ करणे, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करणे. जेणेकरून आपले गाव व पर्यायाने आपला तालुका कोरोना विषाणूपासून लवकरच मुक्त होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज व्यक्त केला.

तसेच बारामती तालुक्यात कोविड केअर
सेंटर, संस्थात्मक विलगीकरण सुविधा वाढविण्या सोबतच, कोरोनाबधित रुग्णांच्या अधिकाधिक संपर्क शोधण्यावर व तपासण्या करण्यावर अधिक भर द्या, अशा सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या.

बारामती शहरासोबतच ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोरोना चाचणी व कोरोना बाधित रुग्णांचा संपर्क शोध मोहिमेसाठी  स्वतंत्रपणे समन्वयासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, असे
निर्देश जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

या व्यतिरिक्त ते म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामीण भागातूनही मोठया प्रमाणात सहकार्य मिळावे. नागरिकांमध्ये कोरोना संसर्गाबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.असे जिल्हाधिकारी राम म्हणाले.

त्यांनी बारामती शहरातील दोन प्रतिबंधित
परिसरास भेटी दिल्या. या भेटी दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना मास्क, सॅनिटायझर व इतर वैद्यकीय सुविधा रोजच्या रोज पुरविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्याच बरोबर प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या इतर काही अडचणी असल्यास त्या प्रशासनाने तत्काळ दूर कराव्यात. एका कोरोना बाधित रूग्णाच्या मागे कमीत कमी वीस व्यक्तींच्या तपासण्या करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

न्युज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा