राज्यात काल विक्रमी लसीकरण, एकाच दिवसात ५.५२ लाख नागरिकांना लस

मुंबई, २३ जून २०२१: राज्यात कालपासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. राज्यात काल एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार ९०९ जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविण्यात आला आहे. आरोग्य यंत्रणेच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समाधान व्यक्त करतानाच त्यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात अग्रेसर असून हे सातत्य टिकवत आतापर्यंत सुमारे २ कोटी ८५ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. काल दिवसभरात ५ लाख ५२ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. रात्री ८ वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात अजून वाढ होऊ शकते, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. यापूर्वी दि. २६ एप्रिल रोजी एकाच दिवशी ५ लाख ३४ हजार नागरिकांना लस देण्यात आली होती, असेही डॉ.व्यास यांनी सांगितले

देशात दिवसभरात ८० लाखांहून अधिक नागरिकांचं लसीकरण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार काल देशात ८० लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. कालपासून देशातील १८ वर्षांवरील व्यक्तींना मोफत लस दिली जाणार आहे. १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून कालच्या दिवशी सर्वाधिक व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार रात्री ८ वाजेपर्यंत ८०,९६,४१७ लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा