मुंबई, २३ जुलै २०२१: सतत पडणाऱ्या पावसाने राज्याला झोडपले आहे. पावसाच्या पाण्यामुळे सर्वत्र हाहाकार माजवला आहे. कोकणातील चिपळूणमध्ये पावसाच्या पाण्यामुळे दरड कोसळली आहे. तर अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यात अनेक वाहने वाहून जात आहेत. तर दुसरीकडे मुंबईत कल्याणमधील उल्हास नदीला पूर आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबईकडून राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत. हवामान विभागाचे ज्येष्ठ अधिकारी के.एस.होसाळीकर यांनी कोकणात २ ते ३ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकणात अनेक ठिकाणी पूरस्थितीनिर्माण होऊ शकते, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
२३ जुलैची पावसाची काय स्थिती?
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग,अमरावती जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, जळगाव, औरंगाबाद, जालना, अकोला, परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर जिल्ह्याला यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
२४ जुलै रोजी काय स्थिती?
२४ जुलै रोजी राज्यातील पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे. त्या दिवशी राज्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. तर, मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती आणि अकोला जिल्ह्याला यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
२५ जुलैसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला केवळ ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. तर, मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. 26 जुलैसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला केवळ यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे