पिंपरी शहरात आता प्रादेशिक परिवहन कार्यालय

पिंपरी, पुणे २० जुलै २०२३ : पिंपरी-चिंचवड शहरात प्रादेशिक परिवहन कार्यालय लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे आरटीओतील कामानिमित्त नागरिकांना पुण्यात मारावा लागणारा हेलपाटा आता लवकरच वाचणार आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यातील नऊ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचा दर्जा वाढविण्याबाबत गृह विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता.

यामध्ये पिंपरी-चिंचवड, जळगाव, सोलापूर, अहमदनगर, वसई, चंद्रपूर, अकोला, बोरीवली आणि सातारा या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांचा समावेश होता. गृह विभागाने परिवहन आयुक्तांच्या प्रस्तावाला मान्यता दिली. पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांचा दर्जा वाढवून त्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयात रुपांतर होणार आहे. त्यामुळे ड्रायव्हिंग स्कूलचा परवाना, नॅशनल परमीट आदींसाठी पुणे आरटीओमध्ये नागरिकांचा होणारा हेलपाटा वाचणार आहे.

दर्जा वाढल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या देखील वाढणार आहे. अधिकारी आणि कर्मचारी वाढल्यामुळे सध्याच्या मनुष्यबळावर येणारा ताण कमी होणार आहे. नागरिकांची अनुज्ञप्ती, वाहन फिटिंग प्रमाणपत्र, पासिंग आणि इतर कामे वेळेत होण्यासाठी मदत होणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा