मला विरोधी पक्षनेते पदातून मुक्त करा, पक्ष संघटनेतील कोणतीही जबाबदारी मी पार पाडेल, अजित पवारांची मागणी

मुंबई २२ जून २०२३: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंबईत कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली ही इच्छा व्यक्त केली. यावेळी त्यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदातून मुक्त करा, पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या कामाची जबाबदारी द्या, आपल्याला कोणतीही जबाबदारी मिळाली तरी आपण तिला न्याय देण्याचा प्रयत्न करु, असे अजित पवार मेळाव्यात म्हणाले.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, पक्ष खडतर काळातून जात असताना सुनील तटकरे यांनी तीन वर्ष प्रांताध्यक्ष पद सांभाळले. त्या काळात पक्षाचे ४२ उमेदवार निवडून आले. त्यानंतरच्या काळात जयंत पाटील यांनी पाच वर्ष एक महिना प्रांताध्यक्षपद सांभाळले, त्यांच्या कार्यकाळात विधानसभेला पक्षाचे ५६ आमदार निवडून आले. यावर जयंत पाटील यांनीही मिश्किल टिप्पणी करत, अजित दादांनी माझा कार्यकाळच मोजून ठेवला आहे असे म्हटले.

अजित पवार यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलय. काही जणांना अजितदादांचा प्रदेशाध्यक्षपदावर डोळा असल्याचे जाणवते. तर अजित पवार यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली की, अजितदादा यांनी आपल्या मनातील इच्छा व्यक्त केलीय, शेवटी वरिष्ठ नेते शरद पवार यावर निर्णय घेतील. पुढील काळात निवडणुका आहेत, त्यांना वाटले असेल मी पक्ष संघटनेमध्ये काम करावे, म्हणून त्यांनी ही इच्छा व्यक्त केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा