पक्षी विश्व – छोटा धीवर (Small Blue Kingfisher)

किंगफिशर हे आपल्या परिचयाचं नाव आणि परिचयाचा पक्षी. हा छोटा धिवर किंवा छोटा किंगफिशर पक्षी नदी, डबकी, मोठ्या विहिरी तसेच तलावांच्या परिसरात व समुद्राच्या किनाऱ्यावर आढळून येतो. पाण्यालगतच्या झाडा-झुडुपाच्या फांदीवर तसेच खोडावर किंवा खडकावर बसून, पाण्यातील भक्ष्यांच्या हालचालीवर नजर ठेवून असतो. भक्ष दिसले रे दिसले की, हा पक्षी पाण्यात सूर मारून ते भक्ष पकडतो आणि पाण्याबाहेर येऊन उडत आपल्या जागेवर परत येतो व भक्ष्याला खाऊन टाकतो. उडत जाताना चिची – चिची- चि, असा आवाज काढत साद देतो.

निळ्या व हिरवट रंगाच्या या पक्ष्याच्या डोळ्यांखाली तांबूस नारिंगी रंगाची कर्णपिसे असतात, व त्या मागे पांढऱ्या रंगाचा स्पॉट असतो. पोटा-खालचा तांबूस नारिंगी रंग त्याच्या सौंदर्यात भर टाकतो.पाठीवरील निळ्या-हिरवट रंगाची पिसे उन्हात चकाकतात. डोक्यावर पांढऱ्या रंगाचे ठिपके असतात. यांचा विणीचा हंगाम- मार्च ते जून दरम्यान असतो.

धिवर या पक्षाची चोच लांब व सरळ असते. पाय लाल रंगाचे असतात. लहान मासे, किटक. इ. चोचीने टिपून खातो. ओढ्यांच्या व नदी-किनारच्या मातीच्या बांधाला पोखरून आत घरटे तयार करतो. भारतात हा बहुतेक करून सर्वत्र आढळतो.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा