वन्यप्राणी : हंगूल (Kashmir Stag)

हंगूल हे मोठे हरीण आहे. ते काश्मीर स्टॅग (काश्मीर बारशिंगा) या नावाने ओळखला जाते. भारतात जम्मू व काश्मीर येथे मोठ्या प्रमाणात त्यांचा आढळ असून ते काश्मीर दरीच्या उत्तरेस व आसपासच्या दऱ्यांमध्ये आढळतात. त्यांचा वावर समुद्र सपाटीपासून १,५००-३,७०० मीटर उंचीवर असतो. तो तांबड्या मृगाच्या प्रजातीतील असून त्याचे शास्त्रीय नाव सर्व्हस एलिफस हंग्लू असे आहे. स्तनी वर्गाच्या समखुरी (पायाच्या खुरांची संख्या सम असलेल्या आर्टिओडॅक्टिला) गणातील सर्व्हिडी या कुलामधील एक प्राणी.

हंगूल हरीण दिसावयास खूप आकर्षक व सुंदर असून त्याचा रंग फिकट पिवळा ते गडद तपकिरी असा असतो. त्याचे डोके मोठे व तोंड अरुंद असते. त्याची डोक्यासहित शरीराची लांबी सात फुटापर्यंत असते. त्याची खांद्यापर्यंतची उंची साडेचार ते पाच फुटापर्यंत असून शेपटी आकाराने लहान असते. नराचे वजन २००-३०० किलो, तर मादीचे वजन १००-१५० किलो असते. नरामध्ये पोटाकडचा भाग गडद तपकिरी रंगाचा असून दोन्ही बाजू व पायफिकट रंगाचे असतात. नराच्या मानेवरील केस लांब, दाट व राठ असतात. याचे ओठ, हनुवटी, पोटाखालचा भाग व कुल्ले पांढरे असुन पाडस व वयस्कर माद्यांच्या शरीरावर पांढरे ठिपके असतात. उन्हाळ्यात त्यांचा रंग फिकट होतो व शरीरावरील फर इतर ऋतूच्या मानाने तेजस्वी होते. थंडीत त्यांचा रंग गडद होतो.

हंगूलमध्ये नराची शिंगे आकर्षक, पसरट व विविध आकारांत असतात, तर मादीला शिंगे नसतात. प्रौढामध्ये शिगांची लांबी चार फुटापर्यंत असून शिंगाला दहा बारा शाखा फुटतात. तर काही वेळा त्यांची संख्या त्यापेक्षाही जास्त असते. मार्च-एप्रिलमध्ये शिंगे गळून पडतात व त्याजागी नवीन येतात. सप्टेंबर अखेर नवीन शिंगे चांगली कठीण बनतात.

हंगूल हरीण मुख्यतः झाडांचा कोवळा पाला व गवत यांवर उपजीविका करतो. तो एकटा किंवा कळपाने फिरत असून सतत एका जंगलातून दुसऱ्या जंगलात स्थलांतर करतो. हंगूल हरीण थंडीत उंचीवरून खाली वास्तव्यास येते आणि उन्हाळ्यात परत उंच जागी जातात. ऑक्टोबरच्या सुरुवातीस माद्यांमध्ये नर येऊन मिसळतात. मेटिंग काळात माद्यांवर ताबा मिळविण्यासाठी नरांची एकमेकांशी झुंज होते व ताकदवान नर अनेक माद्यांचा ताबा मिळवितो. नोव्हेंबरमध्ये माद्यांना सोडून नर परत उंचावर जातात. एप्रिलमध्ये नवीन पाडसे जन्माला येतात. तीन वर्षांनी त्यांची पूर्ण वाढ होते. हंगूल हरीणाचे सरासरी आयुर्मान २५ वर्षे असते.

हंगूलचे जंगलामध्ये मुख्यत्वे चार नैसर्गिक शत्रू आहेत. त्यामध्ये हिमालयन तपकिरी अस्वल, हिमालयन काळे अस्वल, हिम बिबट्या (स्नो लेपर्ड) यांचा समावेश होतो. मानव सुद्धा त्यांचा मोठा शत्रू आहे. शिंगांसाठी व कातडीसाठी केलेल्या शिकारीमुळे त्यांची संख्या खूप घटली असुन जंगलतोडीमुळे त्यांचा नैसर्गिक अधिवासही धोक्यात आला आहे. त्यांची संख्या १९७० सालापर्यंत खूप घटल्यामुळे त्यांच्या शिकारीवर वन्य जीव संरक्षण कायद्यान्वये बंदी घालण्यात आली आहे. जम्मू व काश्मीर या राज्याचा तो राज्यप्राणी असून पोस्ट व टेलिग्राफ विभागाने काश्मीर स्टॅगचे पोस्टाचे तिकीट तयार केले आहे. दुसरा एक Stag हा तांबड्या मृगाच्या (हरणाच्या) प्रजातीतील असून तो भूतानमध्ये आढळतो. भारतीय उपखंडात याच्या दोन उपजाती आढळतात. यूरोपमधील तांबड्या मृगाची (हरणाची) उपजाती उत्तर आफ्रिका, उत्तर अमेरिका व हिमालयाच्या उत्तरेस आढळते.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा