राज्यात पुढील ४ दिवस अवकाळी पावसाचा इशारा, रब्बीच्या हंगामात बळीराजाचा अवकाळीशी होणार सामना

पुणे, २४ नोव्हेंबर २०२३ : महाराष्ट्रातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत आहे. तर दुसरीकडे पुण्यासह मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्याचा थेट परिणाम पिकांवर होत असल्याने अवकाळी हवामानाचा अंदाज आल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर रविवारी उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

अशा स्थितीत हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार दिवस शहरासह जिल्ह्यात पहाटे ढगाळ आकाश आणि धुके राहण्याची शक्यता आहे. तर दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता अजूनच वाढली आहे.

सागरी स्थितीमुळे मध्य महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, बीड, नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या सर्व जिल्ह्यांना पावसाचा फटका बसू शकतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा