पक्षीविश्व- भारतीय चष्मेवाला पक्षी (Indian white-eye)

पुणे, ७ जुलै २०२३: भारतीय चष्मेवाला पक्षी हा चिमणीपेक्षा आकाराने लहान आहे, तो भारतीय उपखंडात सर्वत्र आढळतो. याच्या डोळ्यांभोवती असलेली पांढऱ्या रंगाची वर्तुळे चष्म्यासारखी दिसतात, म्हणूनच त्याला चष्मेवाला हे नाव पडले. या आधी हा पक्षी ‘ओरिएन्टल व्हाईट आय’ (Oriental white-eye) या नावाने ओळखला जायचा, पण पक्षीवैज्ञानिकांकडून हेच नाव दुसऱ्या एका प्रजातीस देण्यात आल्यामुळे याचे नाव बदलून ‘इंडीयन व्हाईट आय’ (Indian white-eye) असे करण्यात आले. याचे शास्त्रीय नाव झोस्टेरॉप्स पाल्पिब्रोसस  (Zosterops palpebrosus) आहे. हा पक्षिवर्गातील पॅसेरीफॉर्मिस (Passeriformes) गणातील झोस्टेरॉपिडी (Zosteropidae) या कुलातील पक्षी आहे.

चष्मेवाल्याचे नर व मादी दिसायला सारखेच असतात. हा पक्षी ८-९ सेंमी. लांब असून त्यांचा रंग हिरवट पिवळसर असतो. याचा गळ्याचा, छातीचा थोडा भाग व बुडावरील पिसे ही पिवळी असून पोटाचा भाग पांढरा-करडा असतो. शेपटी चौकोनी आकाराची व गडद तपकिरी रंगाची असुन चोच काळी, बारीक, टोकदार आणि किंचित बाकदार असते. डोळ्यापासून चोचीपर्यंतचा भाग काळसर तसेच पाय काळे असतात. आकार व रंगछटा यांनुसार याच्या साधारणत: ११ उपजाती आढळतात.

भारतीय चष्मेवाला हा पक्षी सर्वत्र आढळत असला तरी तो शुष्क वाळवंटी भागांत कमी दिसतो. भारतात तसेच पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतानमध्येही हा पक्षी आढळतो. विरळ झाडांचे प्रदेश, खुरटी जंगले, आर्द्र वने, खारफुटी जंगले, बागा ही चष्मेवाल्याची निवासस्थाने आहेत. बहुतांशी आढळणाऱ्या जाती या जास्त करून कीटकभक्षी आहेत. हे सतत झाडावरच राहतात फक्त पाणी पिण्यासाठी किंवा डबक्यात आंघोळ करण्यासाठी जमिनीवर उतरतात. झाडाझुडपांच्या पानांतून, सालीतून ते खाद्य पकडण्यात सतत मग्न असतात.

विणीचा हंगाम वगळता इतर वेळी चष्मेवाला पक्षी हा थव्यानेच फिरताना आढळतो. थव्यात चार ते वीस पर्यंत पक्षी असतात. प्रजनन काळात नर-मादी एकत्र वेगळे राहतात. फेब्रुवारी ते सप्टेंबर हा त्यांचा प्रजनन काळ असुन यांना घरटे बांधण्यासाठी फक्त चार दिवस लागतात. झाडावर चार पाच फुट उंचीवर त्यांचे घरटे असते. उभे-आडवे धागे विणून लहानशा कपाच्या आकाराचे घरटे बनले जाते. यात मादी दोन ते तीन अंडी घालते. घरटे बांधणे, अंडी उबविणे आणि पिलांना खाऊ घालण्याचे काम नर आणि मादी दोघे मिळून करतात. पिले अंड्यातून बाहेर येण्यासाठी साधारण दहा दिवस लागतात.

चष्मेवाला पक्षी हा मुख्यत: कीटकभक्षी असुन बऱ्याचदा तो फुलांचा रस पिताना किंवा फळे खातानाही दिसतो. ते एकमेकांना चुईर्रऽऽ चुईर्रऽऽ असा बारीक आवाज देतात. या पक्ष्यांकडुन परागीभवनाचे कार्य मोठया प्रमाणावर घडते. या पक्ष्याच्या आयुर्मानाबाबत विषेश माहिती उपलब्ध नाही. पण एका रिपोर्ट नुसार मॉरिशस मधील कॅप्टीव्हीटी मधील व्हाइट आय पक्षी हा अकरा वर्षे जगल्याची नोंद आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा